म्हापसा : नाताळ सण व त्यानंतर येणा-या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कळंगुट किनारी भागात वाढत्या अमली पदार्थाच्या व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी पहाटे घाना देशाच्या नागरिकाकडून ९० हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. मागील दोन दिवसात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. या दोन्ही कारवाईत अंदाजीत ३ लाख रुपयापर्यंतचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.या वर्षात एकूण ४० कारवाई कळंगुट पोलिसांकडून करण्यात आल्या. शनिवारी पहाटे कळंगुट येथील एका नामांकित हॉटेलजवळ करण्यात आलेल्या कारवाईत जॅक्सन गॅब्रियल या घाना देशाच्या नागरिकाकडून ९ ग्रॅमचा कोकेन जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे ९० हजार रुपये आहे. त्यांने सोबत आणलेल्या अमली पदार्थाचे वितरण करण्यासाठी ग्राहकाची प्रतीक्षा करीत असताना सदरची कारवाई करण्यात आली. त्याबरोबर त्यांनी वापरलेली दुचाकी सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे.शुक्रवारी नायजेरिय नागरिकाकडून २ लाख ९० हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. या वर्षी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या संशयीतात नायजेरिन नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. पुढील तपास उत्तर गोव्याचे अधीक्षक उत्कर्ष प्रसून्न यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपअधिक्षक एडवीन कुलासो निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या देखरेखीखाली तपास सुरू करण्यात आला आहे.
कळंगुट पोलिसांची अमली पदार्था विरोधी मोहीम सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:41 IST