धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 02:03 PM2024-02-20T14:03:54+5:302024-02-20T14:05:02+5:30

शिवरायांमुळे अनेक मंदिरे वाचली

it was the shivaji maharaj who stopped the portuguese from forced conversion said chief minister | धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री 

धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री 

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली, धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनी पोर्तुगीजांना रोखले, असे उद्‌गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले. येथील शिवजयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी झाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती, धर्मांना घेऊन पुढे गेले. त्यांची प्रत्येक कृती आचरणात आणण्यासारखी आहे. गोव्यात पोर्तुगीज राजवट असताना मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती. शिवाजी महाराज त्याकाळी गोव्यात आले नसते तर उरलेली मंदिरेही उद्ध्वस्त झाली असती. सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले नार्वे येथील सप्तकोश्वर मंदिर पुन्हा बांधले आणि पोर्तुगीजांना यापुढे धर्मपरिवर्तन तसेच मंदिरे उद्ध्वस्त करता येणार नाहीत, असे खडसावून सांगितले. त्यामुळेच आमची मंदिरे वाचली.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मच्छिमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार कार्लस फेरेरा, दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सरपंच स्वप्निल चोडणकर, सोनिया पेडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष किशोर अस्नोडकर, तिन्ही पंचायतीचे उपसरपंच, पंच सदस्य, पर्यटन खात्याचे संचालक सुनील आंचिपाका आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

रामलल्ला अयोध्येतील मंदिरात कधी विराजमान होणार, याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून होती. लोकांच्या इच्छेनुसार रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीतून विकसित भारत २०४७ पाहण्यासाठी आजचा युवक साक्षीदार होणार आहेत. नवभारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शिवशाही, शिवराज्य आणि रामराज्य आणण्यासाठी लोकांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी खासदार तानावडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सरपंच चोडणकर यांनी स्वागत केले. यावेळी शिवशाहीर नंदेश उमप, मूर्तिकार प्रशांत खेडेकर आणि जोसेफ लोपीस यांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवशाहीर नंदेश आणि साथी कलाकारांनी शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रम सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. अनावरण सोहळ्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. मिरवणुकीत पर्वरीवासीयांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता.

 

Web Title: it was the shivaji maharaj who stopped the portuguese from forced conversion said chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.