लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: मंत्रिपद मिळवण्यासाठी कोणतीही पूर्वअट किंवा अपेक्षा बाळगून आम्ही भाजपात सामील झालो नाही. ज्यांना पदे मिळायची होती त्यांना ती प्राप्त झाली. असे असले तरी सरकारमधील काही मंत्री चांगले काम करतात आहेत, तर काहीजण कामच करीत नाहीत. अशावेळी मंत्रिमंडळात फेरबदल किंवा खात्यांची फेररचना करण्याची गरज असल्याचे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.
दोन दिवसांपूर्वी केदार नाईक यांनी लोबोंची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याची मागणी केली होती. या मागणीचे डिलायला लोबो यांनी समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर लोबोंनी सरकारपुढे मंत्रिमंडळ बदल करण्याची गरज असल्याचा एक प्रकारे प्रस्तावच मांडला आहे. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलावरुन वारंवार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आमदार मायकल लोबो हे फेरबदलाच्या मुद्द्यावरुन सतत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
मंत्रिमंडळात फेरबदल करावा किंवा नाही, हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा तसेच पक्षाचा आहे. सरकारकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत पण लोकांची कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याने त्यांचा अपेक्षाभंग होऊ लागला आहे. कामे पूर्ण करुन घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी किमान काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल करावे, असेही लोबो म्हणाले. हे मंत्री कोण त्याबाबत आपण भाष्य करणार नसल्याचेही लोबोंनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात पण त्यांना मंत्रीमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांकडून अपेक्षेनुसार सहकार्य लाभत नसल्याचे लोबो म्हणाले.
विरोधी पक्षात पोकळी; आवाज उठवतच नाहीत
यावेळी आमदार मायकल लोबो यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. आपण विरोधी पक्षात असताना गोमंतकीयांच्या हिताचे प्रश्न घेऊन आवाज उठवत होतो. पण आता विरोधी पक्षात पोकळीक निर्माण झाली आहे. जर आज आपण विरोधात असतो तर अनेक मुद्दे उपस्थित केले असते. पण सध्या विरोधकांनी मुद्दे उपस्थित करणेच सोडून दिले असल्याचेही आमदार लोबो म्हणाले.