पणजी : आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) पुरविणाऱ्या जगभरातील तज्ज्ञांची एक महापरिषद येत्या महिन्यात गोव्यात भरणार आहे. दि. १६ ते १९ आॅक्टोबर असे तीन दिवस चालणारी ही परिषद वैद्यकीय क्षेत्रातील पहिली गोव्यात भरणारी आंतरराष्ट्रीय परिषद ठरेल, असा दावा आयोजकांनी केला आहे. जगातील २३ देशांनी सदस्यत्व पत्करलेल्या एशियन ईएमएस काउन्सिल या संघटनेने या परिषदेचे आयोजन केले असून आयोजनासाठी लागलेल्या आंतरराष्ट्रीय बोलीद्वारे गोव्याला हा सन्मान मिळालेला आहे. १०८ ही राज्यातील गाजलेली आपत्कालीन वैद्यकीय सेवा कार्यरत होण्याअगोदरपासून अशाच प्रकारची प्रभावी सेवा पुरवणारे बडोद्याचे लाईफलाईन फाउंडेशन, झोत मेडिकल कॉर्पोरेशन आणि मणिपाल हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून आयोजित होणाऱ्या या परिषदेत २३ देशांतील तज्ज्ञ सेवेविषयीच्या माहितीचे आदानप्रदान करतील. आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे महत्त्व जाणवू लागल्याच्या पार्श्वभूमीवर या परिषदेतील ऊहापोहास वेगळेच परिणाम लाभले आहे. परिषदेत आशिया खंडातील ४०० प्रतिनिधी, ६० आंतरराष्ट्रीय वक्ते यांच्यासह देशातील २५० प्रशिक्षणार्थी भाग घेणार आहेत. एकूण ८ कार्यशाळांचे आयोजन या ४ दिवसीय परिषदेत करण्यात आले आहे. आशियाई देशांबरोबरच आॅस्ट्रेलिया, अमेरिका, युरोपातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. पणजीतील कला अकादमीत भरणारी ही परिषद पॅरामेडिक्सबरोबरच, अग्निशमन, बुडणाऱ्यांना वाचवणारे, डॉक्टर्स तसेच सेवा प्रशासकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)
आपत्कालीन सेवाविषयक आंतरराष्ट्रीय परिषद गोव्यात
By admin | Updated: September 4, 2014 01:20 IST