पणजी : राज्यात खनिज व्यवसाय नव्याने सुरू झाला, तर ते ट्रकमालकांच्या हिताचे ठरेल. तसेच खाणींवर अवलंबून असलेल्या अन्य अनेक कुटुंबांसाठीही तो मोठा आधार ठरेल. म्हणूनच मी खनिज वाहतुकीचा व ट्रकमालकांचा प्रश्न सोडविण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी येथे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, मला सेसा गोवा-वेदांता कंपनीशी काही देणेघेणे नाही. गोव्यात खाण व्यवसाय सुरू झाला, तरच सरकारला महसूल मिळेल; शिवाय हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचाही प्रश्न सुटेल. साडेतीन वर्षे खाण व्यवसाय बंद पडल्याने ज्यांची होरपळ झाली, त्या लोकांना दिलासा मिळेल. सरकार सलगपणे खाण अवलंबितांना पॅकेज देऊ शकणार नाही. खाण व्यवसाय सुरू झाला, तर ट्रकमालकांसह अन्य अनेक कुटुंबांना पुन्हा रोजगार प्राप्त होईल. हाच हेतू नजरेसमोर ठेवून मी ट्रकमालक व सेसा कंपनीशी बोलणी करत आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ट्रकमालकांच्या खनिज वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी कुणीही मध्यस्थ म्हणून माझ्याकडे चर्चेसाठी आले, तर मी चर्चा करेन. कुठलीही संघटना किंवा पक्ष चर्चेस आला, तर मी तयार आहे. समस्या सोडविण्यास मी प्राधान्य देत आहे. हा प्रश्न आणखी जटिल बनू नये, त्यात राजकारण शिरू नये म्हणून मी काळजी घेत आहे. (खास प्रतिनिधी)
खाण व्यवसायातून ट्रकमालकांचेच हित!
By admin | Updated: December 20, 2015 02:27 IST