लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यातील महागाई ही सध्या संपूर्ण देशातील महागाईच्या टक्केवारीत दुप्पटीने वरचढ आहे. हे एका आर्थिक सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. वाढती महागाई कमी करण्यासाठी भाजप सरकार काय पाऊले उचलत आहेत, याबद्दल सरकारने जनतेला उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी फातोर्डाचे आमदार तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.
फातोर्डा येथे आपल्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी सरदेसाई म्हणाले की, सद्या, राज्यात महागाईचा स्तर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भाजप सरकार स्वयंपूर्ण गोवा, आणि अंतोदय तत्वाबद्दल बोलत असते पण राज्यातील प्रत्येक नागरिकाला महागाईची झळ लागत आहे, त्यावर मात्र गप्प राहते.
एक खाजगी अर्थकारण सर्वेक्षणाचा हवाला देत आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, एप्रिल २०२५ अखेर केलेल्या सर्वेक्षणात संपूर्ण देशाची महागाई टक्केवारी ३.१६ टक्के तर गोव्याची महागाई टक्केवारी ही ६.९५ टक्के एवढी आहे. जर ही आकडेवारी पाहितील तर राज्याची महागाई ही देशाच्या महागाईपेक्षा दुप्पटीने वाढलेली दिसते. यामुळे, सामान्य माणसाची वस्तू आणि साधन सुविधा खरेदी करण्याची क्षमता ही बऱ्याचप्रकारे कमी होत आहे.
महागाईच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका
सरकारवर टीका करताना, सरदेसाई म्हणाले, की, राज्यातील महागाई कमी करावी म्हणून राज्य सरकारने विशेष पाऊले उचलायला पाहिजे होती, पण तसे काही न करता हे सरकार फक्त मोठमोठे महोत्सव आयोजन करून जनतेचा पैसा वायफळ गोष्टीत उडवत आहेत. अनेक योजनांचे पैसे जनतेला मिळत नाही. जनतेने या गोष्टी लक्षात ठेवून सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत आणि सरकारने जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असे मतही आमदार सरदेसाई यांनी व्यक्त केले.