पणजी : भारतीय मुस्लिम दहशतवादी नव्हे, ते देशप्रेमीच आहेत. इंडियन मुजाहिद्दीनसारख्या संघटनांमधील काहीजण चुकीची वक्तव्ये करत असले तरी त्याविषयी मुस्लिम धर्मियांना दोष देता येणार नाही, असे मत अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खुर्शीद अहमद सय्यद यांनी व्यक्त केले.सय्यद हे गोवा भेटीवर आले होते. त्यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीवेळी लोकांना दिलेली आश्वासने भाजप विसरला आहे. त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. देशात विकास केला जात नाही. उलट भाजपचे काही केंद्रीय मंत्री व खासदार अत्यंत भयानक वक्तव्ये करत आहेत. मतांचे ध्रुवीकरण करून देशात भाजपला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपला केंद्रात निवडून दिले ही चूक झाली, असे आता लोक बोलत आहेत.ते म्हणाले, की भारतीय मुस्लिम हा मुलतत्त्ववादी व्हावा असा प्रयत्न भाजपच करत आहे. प्रक्षोभक अशी विधाने करून भारतीय मुस्लिमांना लढण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. मात्र, भारतीय मुस्लिम समाज हा शांत आहे. तो प्रक्षोभक विधानांना आता फसत नाही. मूळ भारतीय मुस्लिम दहशतवादी नव्हे. इतर काही देशांतील काही मुस्लिम दहशतवादात आहेत.(खास प्रतिनिधी)
भारतीय मुस्लिम देशप्रेमीच : सय्यद
By admin | Updated: April 9, 2015 01:25 IST