लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'स्मार्ट सिटीची कामे केली नसती तर शहराची स्थिती बिकट झाली असती. काही कामे योग्यरीत्या झालेली नाहीत हे मी मान्य करतो. परंतु मलनिःसारण वाहिन्यांच्या बाबतीत 'व्हॅक्युम सक्शन' सारखे उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले. देशातील हा पहिला प्रयोग ठरला आहे. लवकरच सांतीनेज नाल्याचे कामही हाती घेतले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
पणजी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा काल उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील २५ वर्षे आम्ही आमदार असू की नाही ठाऊक नाही. परंतु विकासाचा ध्यास आम्ही घेतला आहे. गेल्या बारा वर्षाच्या काळात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची पायाभूत विकासाची कामे राज्यात झालेली आहेत. यात पूल, रस्ते आदी सर्व काही आले. राज्याचा अर्थसंकल्प २६ हजार कोटींचा आणि कामे केली ३५ हजार कोटींची यावरुन सरकारचे पायाभूत प्रकल्पांना असलेले प्राधान्य दिसून येते. अटल सेतू, जुवारी नदीवर दुसरा पूल, मोपा विमानतळ झाला नसता तर काय स्थिती असती याचा विचारच न केलेला बरा. आज दाबोळीवर जेवढे प्रवासी येतात तेवढेच मोपालाही येतात.
येत्या दोन वर्षात सरकारी खात्यांमध्ये राज्य कर्मचारी निवड आयोग, जीपीएससी, लेबर सोसायटी, मनुष्यबळ विकास महामंडळाच्या माध्यमातून दहा ते बारा हजार नोकऱ्या देण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, स्वयंरोजगारालाही सरकार प्राधान्य देत आहे. महिला बचत गटांमधील ४५ हजार महिलांनी ३४० कोटी रुपयांची उलाढाल केली. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. भाजपने कधी जात, पात, धर्माचे राजकारण केले नाही. सर्वधर्म समभावाची भावना अखंड तेवत ठेवणे हेच सरकारचे ध्येय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बाबूश यांची स्तूती...
मुख्यमंत्री म्हणाले की, बाबूश हे त्यांच्याकडील महसूल खाते असो किंवा कचरा व्यवस्थापन अथवा कामगार खाते, राज्यातील कोणत्याही कामाबद्दल मंत्री म्हणून त्यांचे नेहमीच सरकारला सहकार्य मिळते. बाबूशनी कधीही कोणत्याच गोष्टीला नाही म्हटले नाही. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही पणजीत भाजपचे कमळ फुलेल.
स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल दिलगिरी
बाबूश मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, एकदा कामे पूर्ण झाल्यानंतर पणजी हे देशातील उत्कृष्ट शहर ठरेल. लोकांनी माझ्यावर केलेली टीका मी नेहमीच सकारात्मक घेतो. काही गोष्टी शहराच्या भल्यासाठीच झाल्या. लोकांच्या काही समस्या असल्यास त्यांनी माझ्याकडे यावे. मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करीन. कठीण काळात मी नेहमीच लोकांसोबत आहे.