लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पेडणेत भाजपच्या तिकिटासाठी शेवटपर्यंत वाट पाहीन. पक्षाने उमेदवारी न दिल्यास अन्य पर्याय शोधेन. परंतु यावेळी पेडणेतूनच निवडणूक लढवण्याबाबत मी ठाम आहे, असे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पेडणेवासीय अजून माझ्याबद्दल अपेक्षा ठेवून आहेत. माझ्याबद्दल पेडणेतील मतदारांमध्ये आपुलकी आहे, म्हणूनच ते मला प्रत्येक कार्यक्रमाला बोलावतात. परंतु स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर हे मला निमंत्रण देणाऱ्या लोकांना धमक्या देतात. असा प्रकार अलीकडेच एका ग्रामपंचायतीच्या बाबतीत घडलेला आहे. त्या पंचायतीने मला कार्यक्रमासाठी बोलावल्यानंतर आर्लेकर यांनी त्यांना धमकी दिली व त्यांची कोणतीच कामे करणार नाही, असे त्यांना सांगितले. त्यानंतर पंचायतीच्या माणसांनी मला फोन करून ही गोष्ट सांगितली व मी स्वतः तिथे जाण्याचे रद्द केल्याचेही आजगावकर म्हणाले.
पेडणेतील मतदारांनी एक-दोन वेळा नव्हे तर चार वेळा मला निवडून आणलेले आहे. २०१७ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद मिळाले. भाजपसाठी माझे काम अजूनही चालू आहे. गेल्यावेळी भाजपने अखेरच्या क्षणी मला मडगावमधून निवडणूक लढवायला सांगितले व मी चकार शब्दही न बोलता मडगावमधून निवडणूक लढवली. मात्र, पुढची निवडणूक पेडण्यातूनच लढविणार असे आजगावकर म्हणाले.
त्यांच्या पायाखालची वाळू सरकली...
आगामी निवडणूक पेडणेतूनच लढवण्याचे मी पक्के ठरवले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते चांगले काम करत आहेत. मी पेडण्यात पुन्हा येणार असे जाहीर केल्यानंतर आर्लेकर तसेच राजन कोरगावकर यांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. परंतु यापुढे मी पेडणे मतदारसंघाचे नुकसान होऊ देणार नाही. पेडणे येथील लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करीन, असेही बाबू आजगावकर म्हणाले.
बाबूंनी मार्गदर्शक बनावे
पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, बाबू आजगावकर यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी. निवडणूक लढण्याची इच्छा सोडून द्यावी व मला पाठिंबा द्यावा. त्यांनी आता साथ दिली तर भविष्यात आम्हीही त्यांना मदत करू शकतो. मी कोणालाही धमकी दिलेली नाही. बाबू कार्यक्रमाला आले म्हणून मला काहीच फरक पडत नाही.