लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व १२ तालुक्यांतील लोकांच्या समस्या घेऊन पावसाळी अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल केला जाईल, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांशी समन्वय साधत सरकारला विविध मुद्द्यावर जाब विचारू, असेही सांगितले.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'आमचो आवाज विजय'च्या बॅनरखाली पक्षाने मागील अनेक दिवसांपासून सर्व तालुक्यांत जाऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकली. आता लोकांच्या समस्या घेऊन सरकारला अधिवेशनात जाब विचारला जाईल. पेडणेत टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न आहेत, वाळपईत नवोदय विद्यालयाचा प्रश्न आहे, पणजीत स्मार्ट सिटी मोठी समस्या बनली आहे. कुडचडेत आरोग्य सुविधांची वाणवा आहे, शिरोडेत पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, सासष्टीत जिल्हा इस्पितळ असूनही आरोग्याच्या अनेक समस्या आहेत तर काणकोणातही विविध समस्या असून, याबद्दल विचारले जाईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले. सभापती रमेश तवडकर हे भाजपच्या बैठकीत उपस्थित राहिल्यावर आपण टीका केली म्हणून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. परंतु असल्या तक्रारींना आपण भीत नाही. कोमुनिदादींच्या जमिनीत असलेली घरे वाचविण्यासाठी सरकारकडून आणल्या जाणाऱ्या विधेयकाविषयी बोलताना सरदेसाई म्हणाले की, त्या विधेयकाचा अगोदर अभ्यास केला जाईल.
...तर दामू नाईक आमचे नेते आहेत, असे मानू
गोमंतकीयांचे विविध प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. पारपंरिक व्यवसाय करणारे भरडले जात आहेत. आम्ही जे विषय काढले त्याच्या समर्थनार्थ खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे. टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या आयएएस अधिकाऱ्यांना कळत नाहीत, असे दामू म्हणाले. त्यामुळे विधानसभेतही त्यांनी आपल्या आमदारांना तशीच भूमिका घ्यायला सांगावे आणि सरकारच लोकांच्या हिताचे काम करीत नाही हे मान्य करण्यास सांगावे जेणे करून आम्ही त्यांना समर्थन देऊ आणि ते आमचे नेते आहेत असेही मानू, असेही ते म्हणाले.