लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मान्सूनपूर्व पावसाने काल दिवसभर राज्याला अक्षरशः झोडपून काढले. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे म्हापसा, पेडण्यासह डिचोली परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. अनेकांच्या घरांत पाणी शिरल्याने लोकांची मोठी तारांबळ उडाली. म्हापसा बाजारात गुडघाभर पाणी साचले होते.
पहिल्याच पावसात अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली तसेच वीज खंडित होण्याचे प्रकारही घडले. छत्र्या, रेनकोट न आणल्याने लोकांची तारांबळ उडाली. काणकोणात रवींद्र भवनच्या वाचनालयाला गळती लागली. यामुळे पुस्तके व फर्निचर खराब झाले. म्हापसा व डिचोलीत सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मडगावच्या कदंब बसस्थानकात पाणी भरले होते.
पणजीत स्मार्ट सिटीची कामे अजूनही चालू आहेत. पर्वरी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले चर पाण्याने भरले. पावसाने गोमंतकीयांची दैना उडवली.
वादळी पावसाचा इशारा
वेधशाळेने आज, बुधवारीही मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर २२ ते २६ दरम्यान 'येलो अलर्ट' जारी केला आहे. मुसळधार पावसासह ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील व हा वेग प्रसंगी ताशी ७० कि.मी.वर पोचू शकतो, असे वेधशाळेने म्हटले आहे.
विमाने वळवली
दाबोळी विमानतळावर दोन विमाने पावसामुळे लैंडिंग न करता ती वळवण्यात आली. पुणे-गोवा विमान हैदराबादला तर मुंबई-गोवा हे विमान बेळगावला वळवले. नंतर बेळगावहून हे विमान गोव्याला आले.