लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : गोव्यातील सर्व इस्पितळे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण आरोग्य केंद्रे आदर्श करण्यात येतील. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. प्रत्येक नागरिकाला वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, जेणेकरून समाजात आरोग्य सुधारता येईल. या उद्देशाने इस्पितळे आणि आरोग्य केंद्रांना 'आदर्श' बनवण्यात येईल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
तिस्क-उसगाव येथे 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' योजनेठतर्गत तिस्क उसगाव येथील पिळये आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या शुभारंभप्रसंगी मंत्री राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मतदारसंघाचे यावेळी सावर्डे आमदार गणेश गावकर, आरोग्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. रूपा नाईक, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आर. जयप्रकाश तिवारी, आरोग्य खात्याचे उपसंचालक डॉ. संदेश मडकईकर, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, धारबांदोडा पंचायतीचे सरपंच विनायक गावस, साकोर्डा पंचायतीच्या सरपंच संजना नार्वेकर, कुळे पंचायतीचे सरपंच गोविंद शिगावकर, उसगाव पंचायतीचे सरपंच संजय ऊर्फ प्रकाश गावडे, उसगाव पंचायतीचे पंच रामनाथ डांगी, विनोद मास्कारेन्स, रेश्मा मटकर आदी उपस्थित होत्या.
महिला सशक्तीकरण व युवकांना रोजगार यावर भर दिला जाईल. लोक प्रतिनिधींनी केवळ भाषण बाजी न करता, प्रजेची सेवा हा संकल्प ठेवून, कृतीतून प्रामाणिकपणे लोकांची सेवा करायला हवी, असे मंत्री राणे म्हणाले. यावेळी आमदार गणेश गावकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. संदेश मडकईकर यांना आरोग्य खात्याचे उपसंचालकपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा आमदार गणेश गावकर यांच्या हस्ते गौरव सत्कार करण्यात आला. या आरोग्य शिबिराचा ५५० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी रुग्णांना औषधांचेही वाटप करण्यात आले.
कुळेत सुविधांयुक्त इस्पितळ उभारणार
पिळये प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व साधन सुविधांनी सुसज्ज केले जाईल. या आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध केली जाईल. उत्कृष्ट जनसेवा बजावणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ज्ञ, अंगणवाडीसेविका, स्वयंसहाय्य गट यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. सर्व आरोग्यसेवा, सोयी-सुविधा असलेले इस्पितळ कुळे येथे उभारण्यात येणार आहे. यामुळे कुळे व आसपासच्या परिसरातील लोकांना आरोग्यसेवेच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत, असे मंत्री विश्वजित राणे म्हणाले.