पणजी : आपल्या मर्जीच्या माणसांच्या सोयीसाठी सरकार कुठल्या थराला जाऊ शकते, याची एक झलक गोवा विद्यापीठाचे कुलगुरू सतीश शेट्ये यांना मुदतवाढ देण्यासाठी केलेल्या अकांडतांडवातून गोमंतकीयांना मिळाली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस हाउसमध्ये पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सरकारच्या कारस्थानाला राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी खो घालताना गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचा निर्णय फेटाळला होता; परंतु सरकारने दबावतंत्र वापरून विशेष अध्यादेश काढून जे करायचे ते करून घेतले. एका माणसासाठी अध्यादेश काढण्यापर्यंतच्या थराला हे सरकार गेले आहे. याचा काँग्रेस निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू यांना मुदतवाढ देणे किंवा न देणे हा वेगळा विषय आहे; परंतु आपल्या मुदतवाढीचा निर्णय आपल्याच अध्यक्षतेखाली बैठक घेऊन घेणे ही पद्धत कोणत्या नियमाला धरून आहे? ज्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांच्याविषयी निर्णय होणार आहे, त्या बैठकीला ते स्वत: कसे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतात? खरे म्हणजे शेट्ये यांना नैतिकची चाड असेल, तर त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा, असे आवाहन कवठणकर यांनी केले. (प्रतिनिधी)
एका व्यक्तीसाठी सरकार खालच्या थराला : काँग्रेसची टीका
By admin | Updated: October 25, 2015 02:13 IST