लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या गोवा दौऱ्यानंतर सरकार आणखी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. केंद्राची दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना प्रभावीपणे राबवण्याबरोबरच 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याची घोषणा हा याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे.
विधानसभा निवडणूक जेमतेम वर्षभरावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर नबीन यांनी गेल्याच आठवड्यात गोवा भेटीवेळी भाजपचे मंत्री, आमदारांना केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाधिक योजना लोकांपर्यंत न्या, जनतेच्या अडचणी सोडवा, त्यांच्या कायम संपर्कात राहा, असा सल्ला दिला होता. त्यांनी दिलेल्या कानमंत्रानंतर सरकार सक्रिय बनले.
लवकरच फोंडा विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूक होणार आहे. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. येत्या ६ रोजी फोंड्यातील लोकांसाठी राजीव कला मंदिरात 'सरकार तुमच्या दारी'चा पहिला कार्यक्रम करण्यामागचा हेतू अधिकाधिक फोंडावासीयांपर्यंत पोचणे हाच आहे.
सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाच्या गेल्या कार्यकाळातही हा उपक्रम राबवला होता. त्यावेळी निवडणुकीला दीड वर्ष असताना १९ सप्टेंबर २०२१ रोजी सावंत सरकारने हा उपक्रम सुरू केला व त्याचा चांगला परिणाम भाजपला फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला.
१७ प्रशिक्षण कार्यक्रम
सर्व बाराही तालुक्यांमध्ये १७ ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील. प्रशिक्षणार्थीला दरदिवशी १६० रुपये विद्यावेतन दिले जाईल. पेडणेपासून काणकोणपर्यंत बेरोजगार युवकांनी या योजनेचा लाभ घेता येईल. आतापर्यंत तीनशे जणांनी नोंदणी केली असून आणखी ३०० जणांची नोंदणी चालू आहे. महिलांसाठी वयोमर्यादा थोडी शिथिल केली असून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील एससी, एसटी व दिव्यांग महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
६ मार्च रोजी गोव्याचे बजेट
दरम्यान, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ ते २७ मार्च असे चालणार असून पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधानसभेचा एकूण कालावधी १४ दिवसांचा असेल. पुढील वर्ष निवडणुकीचे असल्याने या अर्थसंकल्पात सरकारकडून कल्याणकारी योजना जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.
आम्ही लोकांमध्ये आहोत हे स्पष्ट होईल : दामू
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही लोकांमध्ये आहोत हे अशा उपक्रमांमधून स्पष्ट होईल. सरकार तुमच्या दारीमधून पन्नास टक्के लोकांच्या समस्या जरी सुटल्या तरी पुरेसे आहे. मंत्री, आमदार आपापल्या संस्थांनापुरते मर्यादित असू नयेत. मंत्र्याने तर आपण संपूर्ण राज्याचा प्रतिनिधी म्हणून सर्वांचीच कामे करायला हवीत. 'सरकार तुमच्या दारी'मधून मंत्री संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सोबत नेतात व जनतेच्या अडचणी, समस्या तेथल्या तेथे सोडवल्या जातात. लोकांची कामे करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.'
अग्निसुरक्षा एसओपीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
अग्निसुरक्षा एनओसीच्या बाबतीत एसओपीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अग्निशामक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की, नाईट क्लब आग दुर्घटनेनंतर सरकारने एसओपी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकांचे सत्र आरंभले आहे. सातत्याने बैठका घेतल्या जात असून, फायर विभागाशी संबंधित ही बैठकही महत्त्वाची ठरली.
फायर एनओसी कमी कालावधीत मिळावा यासाठी प्रक्रिया अधिक सोपी करणे आणि कालबद्ध करण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः रॉक व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्रातील व्यवसायांसाठी ६ महिन्यांपर्यंतची अल्पकालीन फायर एनओसी देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत अग्निसुरक्षेशी तडजोड केली जाणार नसून, सर्व ठिकाणी योग्य तपासणी अनिवार्य असेल.
तसेच फायर एनओसी मंजुरीसाठी ठरवलेली ऑनलाइन एसओपी काटेकोरपणे पाळली जाईल,' असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. व्यवसायांना गती देतानाच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
Web Summary : Following BJP leader Nitin Nabin's visit, Goa's government revives 'Government at Your Doorstep' on February 6, focusing on public outreach and problem-solving ahead of elections. The budget session starts March 6, with welfare schemes expected. Emphasis is placed on fire safety and streamlined NOC processes.
Web Summary : भाजपा नेता नितिन नबीन के दौरे के बाद, गोवा सरकार ने 6 फरवरी से 'सरकार आपके द्वार' कार्यक्रम पुन: शुरू किया, जिसका लक्ष्य चुनाव से पहले जनता तक पहुंचना और समस्याओं का समाधान करना है। बजट सत्र 6 मार्च से शुरू होगा, जिसमें कल्याणकारी योजनाओं की उम्मीद है। अग्निशमन सुरक्षा और सुव्यवस्थित एनओसी प्रक्रियाओं पर जोर दिया गया है।