लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पहलगाम येथील दहशतवादी-हल्ल्यानंतर अनेक गोवेकरांनी काश्मीर दौरे रद्द केले आहेत. ट्रॅव्हल एजंटांकडे तसेच स्वतः एअरलाइन्स कंपन्यांकडे आरक्षित केलेली तिकिटे रद्द करुन घेतली आहेत.
अनेकांनी अमृतसर, वाघा बॉर्डरचेही दौरे आखले होते तेही रद्द केले आहेत. दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानशी संबंध ताणले गेल्याने वाघा बॉर्डरला होणारी 'बीटिंग रिट्रीट सेरेमनी' परेड तूर्त बंद करण्याच्या हालचाली भारत सरकारने चालवल्या आहेत. पर्यटक ही परेड पाहण्यासाठीच जात असतात. दररोज भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर ही परेड आयोजित केली जाते. हे राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे आणि पर्यटकांसाठी अनोखा अनुभव असतो. सीमा दरवाजे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असतात, परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर ती बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दूर अॅण्ड ट्रॅव्हल्स व्यतिरिक्त स्वतंत्रपणे काश्मीर दौरे करणारेही अनेक गोवेकर आहेत. एअर इंडिया, इंडिगोची दिल्लीमार्गे श्रीनगरला जाण्यासाठी रोज विमाने सुटतात. अनेक गोमंतकीय या विमानांनी काश्मीरला जाण्यासाठी प्रवास करत असतात. तसेच मुंबई, दिल्लीला जाऊन तेथूनही वेगवेगळ्या विमानांनी श्रीनगरला जात असतात. ही तिकिटे हल्ल्यानंतर अनेकांनी रद्द करून घेतली आहेत.
म्हणून बुकिंग रद्द : निलेश शहा
पीबीए हॉलीडेजचे नीलेश शहा म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरसाठी आमच्याकडील बुकिंग काहीजणांनी रद्द केले आहे. लोकांमध्ये असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण आहे. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकवर हल्ला चढवल्यास काश्मीरमध्ये अडकून पडण्याचीही भीती लोकांना वाटते. त्यामुळे आरक्षण रद्द केले जात आहे. शहा हे टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे माजी अध्यक्ष म्हणाले की, गोव्यातून मे महिन्याच्या सुटीत सहलीसाठी जम्मू, काश्मीरला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. साधारणपणे ४०० ते ५०० गोवेकर या दिवसात काश्मीरला जातात. मात्र, हल्ल्यामुळे गोमंतकीय आपले बुकिंग रद्द करत आहेत.