लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : उत्तर प्रदेशमध्ये गुंडांविरुद्ध जशी कारवाई केली जाते, तशीच कारवाई गोव्यात केली जायला हवी. माफिया व गुंडाराजविरुद्ध कडक कारवाई झाली तर समाजकंटकांना योग्य तो संदेश जाईल, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले. आम्हाला गुंडाराज नकोच, असे राणे म्हणाले.
उसगाव येथे काल, बुधवारी सायंकाळी जिल्हा पंचायतीच्या उसगाव -गांजे मतदारसंघाच्या भाजप उमेदवार समीक्षा नाईक यांच्या प्रचारार्थ उडीवाडा उसगाव येथील अंबा भवानी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत प्रचार सभेत ते बोलत होते.त्यावेळी मंत्री राणे यांनी पुन्हा एकदा राज्यातील काही भागातील वाढत्या गुंडगिरीचा विषय उपस्थित केला. 'आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेच.
गुंडगिरीविरुद्ध यूपीमध्ये तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जशी कारवाई करतात, तशीच कारवाई गोव्यात व्हायला हवी. तुरुंगातून गुंड बाहेर आल्यानंतर त्याच्यासाठी काहीजण फटाके लावतात किंवा मिरवणूक काढतात हे धोकादायक आहे.गुंडांना कडक शासन होणे गरजेचे आहे' असे राणे म्हणाले.
बहुजन समाजाच्या नेतृत्वाविषयी बोलताना राणे यांनी गावागावात बहुजन नेतृत्व तयार व्हावे असे मत व्यक्त केले. आपण बहुजन नेतृत्वाला प्राधान्य देत आहे. विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बहुजन समाजातील आहेत, मी देखील बहुजन समाजातील आहे. गोव्यात कायम बहुजन समाजाचेच नेतृत्व असेल असे मंत्री राणे म्हणाले. लोकसेवा हाच राजकारणाचा केंद्रबिंदू असायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण दिली आहे. त्यानुसार आम्ही काम करतोय असे राणे म्हणाले.
राणे म्हणाले की, दोन कोटी रुपये खर्चुन भूमिका देवीचे मंदिर बांधणार आहे. पहिला हप्ता आज, गुरुवारी बांधकाम समितीकडे देणार आहे. साई मंदिरावर नवीन कलश चढविणार आहे. प्राचीन आदिनाथ मंदिराचे सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यासाठी देवस्थान समिती व महाजनांच्या मान्यतेची मी वाट पाहतोय. उसगावातील औद्योगिक वसाहतीतील सर्व आस्थापनांमध्ये स्थानिक युवापिढीला कायमस्वरूपी नोकऱ्या देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्या औद्योगिक आस्थापनांची उसगावात आवश्यकता नाही.
रोजगार, माझे घर योजनेची अंमलबजावणी हवी असल्यास समीक्षा नाईक यांना मतदान करा. नाईक यांना बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आजी माजी पंच, जिल्हा पंचायत सदस्यावर सोपविण्यात आली आहे. समीक्षा ७ हजार मतांनी विजयी होतील, अशी मला अपेक्षा आहे. उमेदवार समीक्षा नाईक, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सरपंच संजय उर्फ प्रकाश गावडे, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, नरेंद्र गावकर, राजेंद्र नाईक, विनोद मास्कारेन्हस, विल्यम मास्कारेन्हस, रेश्मा मटकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, व्यावसायिक सत्यवान देसाई उपस्थित होते. नाईक, सरपंच गावडे, पंच रामनाथ डांगी, नरेंद्र गावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रचार सभेचे सूत्रसंचालन शुभम गावकर यांनी केले.
...तर समीक्षा नाईक यांना जि. पं. अध्यक्ष करू
दक्षिण गोवा पंचायतीमध्ये भाजपचे पूर्ण पॅनल निवडून आल्यास समीक्षा नाईक यांना अध्यक्षपद देण्यात यावे, अशी मी प्रथमच मागणी करणार आहे आणि तो माझा अधिकार आहे, असे यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले.
Web Summary : Minister Vishwajit Rane wants Goa to emulate Uttar Pradesh's strict action against criminals. He emphasized the need for strong measures against goons and mafia to maintain law and order, advocating for the election of Samiksha Naik for development.
Web Summary : मंत्री विश्वजीत राणे चाहते हैं कि गोवा अपराधियों के खिलाफ उत्तर प्रदेश की तरह सख्त कार्रवाई करे। उन्होंने कानून और व्यवस्था बनाए रखने के लिए गुंडों और माफिया के खिलाफ सख्त उपायों की आवश्यकता पर जोर दिया, और विकास के लिए समीक्षा नाइक के चुनाव की वकालत की।