लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात शिल्प कारागिरांना योग्य ते सहकार्य सरकार करत आहे. हस्तकला शिल्पकलेतही गोवा स्वयंपूर्ण व्हावा यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यांचा लाभकारागिरांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वस्त्रोद्योग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या विद्यमाने कला अकादमीत आयोजित 'गांधी शिल्प बाजार' या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री माविन गुदिन्हो व गोवा खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार अॅन्थनी वाझ व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, व्होकल फॉर लोकल या पंतप्रधानांच्या दृरदृष्टीच्या विचारातून आज ग्रामउद्योगाला चांगले व्यासपीठ मिळाले आहे. मोठ्या प्रमाणात आज हस्तकलेच्या वस्तूंना चांगले मार्केट मिळत आहे.
या शिल्प बाजारात देशभरातील कारागीर, शिल्पकार व हस्तकला उत्पादक सहभागी होऊन आपली कलाकृती व उत्पादने सादर करण्यात आली आहे. गांधी जयंतीनिमित्त स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील शिल्पकलेला व हस्तकलेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पारंपरिक कलेचे संवर्धनाचे उद्दिष्ट
मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, हस्तकला वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण कारागिरांना आधार देणे व पारंपरिक कलेचे संवर्धन हे या शिल्प बाजाराचे मुख्य उद्दिष्ट आहे. सरकारने या पारंपरिक कलाकारांच्या कलेचे जतन व्हावे यासाठी देशभर अशा वस्तूंचे प्रदर्शन भरविले जाते.