लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : गिरी येथे महामार्गावर उड्डाणपुलानजीक मिनी प्रवासी बस आणि दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात कायदा खात्याचे अवर सचिव नारायण अभ्यंकर (५१, रा. रामनगर-कोलवाळ) यांचा मृत्यू झाला.
कोलवाळ येथून महामार्गावरून पर्वरीत सचिवालयाच्या दिशेने जाणाऱ्या अभ्यंकर यांना गिरी जंक्शनवरील सर्व्हिस रोडवरून महामार्गावर प्रवेश करणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. त्यात ते खाली रस्त्यावर पडले आणि बसच्या मागच्या चाकाखाली सापडले. त्यात चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बसचालक प्रेमानंद कानोजी याला अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी १०:४५ च्या दरम्यान हा अपघात घडला. अभ्यंकर हे ज्युपिटर स्कूटर चालवत होते. ते पर्वरीतील सचिवालयात जाण्यास निघाले होते. गर्दीच्या वेळी हा अपघात घडला. अपघातानंतर बस चालकाने दुचाकीला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी सांगितले की, बसचालक प्रेमानंद कानोजी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अपघातग्रस्त बस आणि दुचाकीसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चालकाची चौकशी सुरू आहे. त्याला पोलिस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
घटनास्थळी व पोलिसांनी सांगितले की, महामार्गावर गिरी येथील उड्डाणपुलानजीक हा अपघात झाला. सकाळी साडेअकराच्या सुमारास अव्वर सचिव अभ्यंकर हे आपल्या दुचाकीवरून म्हापसाहून पणजीच्या दिशेने जात होते. अचानक त्यांची दुचाकी घसरून ते रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या बसच्या चाकाखाली ते सापडले. बसचे मागचे चाक त्यांच्या शरीरावरून गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नारायण अभ्यंकर हे सुस्वभावी होते. प्रत्येकासोबत ते मिळून मिसळून वागायचे. त्यांच्या अपघाती निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली.
रस्त्यावरील मातीमुळे घसरताहेत दुचाकी
सध्या गिरी येथून फ्लायओव्हरच्या उभारणीचे काम सुरू असल्याने महामार्गावरून मातीच्या ट्रकची वर्दळ सतत सुरू आहे. त्यामधून माती रस्त्यावर सांडते. यातून दुचाकी घसरून अपघात होण्याचा प्रकार घडत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, या अपघातावेळीही रस्त्यावरील मातीमुळे दुचाकी घसरली. या भागात अशा प्रकारचे अपघात सतत घडत असल्याचे सांगण्यात आले.
चालकाला पकडले
दरम्यान, अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अग्निशामक दलाने रस्त्यावर पाण्याची फवारणी करून सफाई केली. या अपघातानंतर या परिसरात बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती.