वास्को : भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात सध्या बांधत असलेल्या सहा अपतटीय गस्ती नौकांसह बहुतांश जहाजे गोवा शिपयार्डने बांधलेली आढळतील. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेत तटरक्षक दलाच्या प्रयत्नात हे शिपयार्ड भागीदार आहे़ ही प्रगती पाहून या शिपयार्डला अतिरिक्त पाच अपतटीय गस्ती जहाजे बांधण्याची जबाबदारी देण्याचे प्राथमिक स्तरावर विचारार्थ असून, त्याबद्दल लवकरच करारही करण्यात येणार आहे़ यावरून गोवा शिपयार्डच्या कार्यक्षमतेवर विश्वासाहर्ता असल्याचे दिसून येते, असे गौरवोद्गार भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महानिदेशक राजेंद्र सिंग यांनी काढले़ शनिवारी सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या दुसऱ्या अत्याधुनिक अपतटीय गस्ती नौकेच्या जलावतरण समारंभावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते़ या वेळी त्यांच्या पत्नी उर्मिला सिंग, गोवा शिपयार्डचे कार्यकारी संचालक तथा अध्यक्ष रिअर अॅडमिरल (निवृत्त) शेखर मित्तल, भारतीय तटरक्षक दलाचे महानिदेशक एस़ के. गोयल, गोवा विभागीय तटरक्षक दलाचे उपमहानिदेशक कमांडर मनोज बाडकर, व्हाईस अॅडमिरल जे़ सी़ डी़ सिल्वा, भारतीय तटरक्षक, नौदलातील अधिकारी उपस्थित होते़ गोवा शिपयार्डचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष रिअर अॅडमिरल (निवृत्त) शेखर मित्तल यांनी स्वागत व प्रास्तविक केले. मित्तल यांनी संरक्षण मंत्रालयाने १२ पाणबुडी सुरुंग जहाज बांधणीसाठी ३२,००० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे धोरण गोवा शिपयार्ड पूर्ण करणार असल्याचे सांगितले़ भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महानिदेशक राजेंद्र सिंग यांच्या पत्नी उर्मिला सिंग यांच्या हस्ते जहाजाची पूजा करण्यात आली़ या वेळी उर्मिला सिंग यांनी या जहाजाचे ‘शूर’ असे नामकरण करून जहाजाचे जलावतरण करण्यात आले़ या वेळी विजय केरकर आणि शुभदा पेडणेकर या कर्मचाऱ्यांनी ऋग्वेदातील ‘आथिथी’चा संस्कृत मंत्रोच्चार केला़ या वेळी या जहाज बांधणीतील विविध विभागांच्या प्रमुखांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृती भेट देऊन सन्मान करण्यात आला़ त्यामध्ये रोहिदास फ ोंडेकर, अंकुश बागकर, डायगो गोमीस, भालचंद्र नाईक, प्रसाद निंबाळकर, सचिन निवाळकर आणि अमित फ ट्टो देसाई यांचा समावेश आहे़ तसेच गोवा शिपयार्डचे अध्यक्ष शेखर मित्तल यांनी उर्मिला सिंग, प्रमुख पाहुणे राजेंद्र सिंग यांना स्मृती भेट दिल्यानंतर तटरक्षक दलातर्फे एसक़े. गोयल यांनी गोवा शिपयार्ड अध्यक्ष रिअर अॅडमिरल शेखर मित्तल यांना स्मृती भेट दिली़ राष्ट्रगीताने जलावतरण सोहळ्याची सांगता झाली़ (प्रतिनिधी)
गोवा शिपयार्डची कार्यक्षमता प्रशंसनीय
By admin | Updated: March 22, 2015 01:17 IST