उत्तर गोव्यातील आरपोरा येथील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्रीनंतर सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागून २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह चार पर्यटकांचाही समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर दिली.
प्राथमिक माहितीनुसार, ही आग नाईट क्लबमधील सिलेंडर स्फोटामुळे लागल्याचा संशय आहे. आगीत मृत्युमुखी पडलेल्या २५ पैकी तीन जणांचा भाजल्यामुळे तर उर्वरित लोकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आगीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरल्याने अनेकांना बाहेर पडणे शक्य झाले नाही, ज्यामुळे गुदमरून मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. २५ जणांमध्ये ४ पर्यटक, १४ कर्मचारी होते आणि ७ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. सहा जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक तपासात नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, "हा दुर्दैवी प्रसंग आहे आणि गोव्यासारख्या पर्यटनस्थळासाठी हे योग्य नाही. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. क्लब व्यवस्थापन तसेच नियमांचे उल्लंघन करून क्लबला चालवण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल."
या दुर्घटनेनंतर परिसरातील इतर नाईट क्लब्सच्या अग्निसुरक्षा परवानग्यांची तपासणी करण्याचे आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त...उत्तर गोव्यातील आरपोरा येथील नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, "उत्तर गोवा जिल्ह्यातील आगीच्या दुःखद घटनेमुळे मौल्यवान जीव गमवावे लागल्याने मी अत्यंत व्यथित आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. या कठीण काळात त्यांना बळ मिळो. जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी मी प्रार्थना करते."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितले की, "गोव्यातील आरपोरा येथे झालेली आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या भावना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी माझी कामना आहे." पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनेनंतर तातडीने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधानांनी सांगितले की, "परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो. राज्य सरकार बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहे."
Web Summary : A cylinder explosion in a Goa nightclub killed 23, including tourists. Negligence of fire safety norms is suspected. The government has ordered an investigation and promised strict action. The President and Prime Minister expressed grief and assured assistance to the victims.
Web Summary : गोवा के एक नाइट क्लब में सिलेंडर विस्फोट से पर्यटकों सहित 23 लोगों की मौत हो गई। अग्निसुरक्षा नियमों में लापरवाही का संदेह है। सरकार ने जांच के आदेश दिए और सख्त कार्रवाई का वादा किया। राष्ट्रपति और प्रधानमंत्री ने दुख व्यक्त किया और पीड़ितों को सहायता का आश्वासन दिया।