लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : घर नोंदणीकृत करण्याच्या कायद्याचा तसेच 'माझे घर' योजनेचा जास्त लाभ उसगावातील लोकांना होणार आहे. या परिसरातील सर्वच घरे लवकरच कायदेशीर असतील, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी काल सोमवारी येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. गणेश चतुर्थीनिमित्त कडधान्य भेट कार्यक्रमात ते बोलत होते.
हा उपक्रम वाळपई मतदारसंघातील विविध भागासह, उसगाव परिसरात झाला. त्यात सात हजार कुटुंबांना कडधान्य देण्यात आले. उसगावात पाचावाडा येथील आदिनाथ सभामंडप व बाराजण येथील नवीन पंचायत सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सरपंच संजय उर्फ प्रकाश गावडे, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच सदस्य रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, राजेंद्र नाईक, विनोद मास्कारन्हेस, विलियम मास्कारन्हेस, नरेंद्र गावकर, रेश्मा मटकर, समाज कार्यकर्ते विनोद शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक रामनाथ डांगी यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले. आभार गोविंद गावडे यांनी मानले.
आठवड्यातून एकदा उसगाववासीयांना भेटणार
गणेश चतुर्थीनंतर मी प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी तिस्क उसगाव येथील कार्यालयात लोकांसाठी उपलब्ध असेन. लोकांसोबत राहून काम करण्याची इच्छाशक्ती आमदारामध्ये असायला हवी. मतदारसंघातील कोणी आजारी असल्यास त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करतो. मतभेद हे सर्वच क्षेत्रात असतात. ते सोडविण्यासाठी विचारशक्ती लागते. येथील पाणी पुरवठा टंचाई समस्या सोडविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे, असेही मंत्री राणे म्हणाले. वाळपई मतदारसंघातील एका भागात आयोजित कार्यक्रमाला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
'एकही घर पाडू देणार नाही'
मंत्री राणे म्हणाले, की यापुढे उसगाव कोमुनिदाद जागेतील घरे बेकायदा आहेत, असे कोणी म्हणू शकणार नाहीत. त्यांना कोमुनिदाद समिती नोटीस काढणार नाही. उसगावातील सर्व घरे कायदेशीर करण्यात येणार आहेत. मग ती जमीन सरकारी, कोमुनिदाद किंवा खासगी असो. मी या भागाचा आमदार असेपर्यंत उसगावातील एकही घर पाडू दिले जाणार नाही.
गणेश चतुर्थीनिमित्त सर्व धर्मातील लोकांना आनंदित करण्यासाठी कडधान्य भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात सर्वधर्मियांना सामावून घेण्यात आले. राजकारण व समाजकारण हे दोन्ही भिन्न आहेत. मी सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणून गणेश चतुर्थी साजरी करतो, असे मंत्री राणे म्हणाले.
उसगावात शहरातील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मागच्या वेळी झालेली चूक सुधारण्यात येईल. या भागाच्या माजी आमदारांच्या व माझ्या काम करण्याच्या पद्धतीचा अनुभव लोकांना आहे, असे मंत्री राणे म्हणाले.