- स्वाती शिवानंद साळगावकर (एमडी, व्ही. एम. साळगावकर व ब्रदर्स)
गोव्यात आयआयटीसारख्या प्रकल्पाला जागा देण्यास विरोध होतोय हे पाहून आश्चर्य वाटते. आयआयटीसारखा प्रकल्प येथे साकारू शकत नाही, मग आम्ही गोव्यात मोठ्या शैक्षणिक संस्था किंवा मोठे उद्योग यावेत अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकतो असा प्रश्न पडतो. बंगळुरु किंवा अन्य ठिकाणी जशी शैक्षणिक व औद्योगिक प्रगती झाली, तशा पद्धतीची प्रगती करण्यासाठी गोव्यातही मोठ्या संस्था याव्या लागतील. मोठ्या शैक्षणिक संस्थांचे स्वागत करावे लागेल. गोव्यात अत्यंत बुद्धिमान, मोठ्या कुवतीचे इंजिनिअर्स तयार व्हावे लागतील. त्यासाठीही जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था हव्यात.
गोव्याच्या शिक्षण व्यवस्थेत थोडी सुधारणा व्हायला हवी. काम करण्यासाठी लागणारे कौशल्य विकसित होण्यासाठी त्या पद्धतीचे शिक्षण उपलब्ध व्हायला हवे. गोव्यात उद्योगांना आणखी पोषक स्थिती निर्माण व्हायला हवी. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याची खूप गरज आहे. गोव्यात प्रत्येकजण स्वतःच्या खासगी वाहनाने प्रवास करू शकत नाही. उद्योगात काम करू पाहणाऱ्या महिला किंवा पुरुष मनुष्यबळासाठी वाहतुकीची सोय हवी असते.
तुम्ही मुंबई-दिल्लीत पाहा, लोक मेट्रोने प्रवास करून कामाच्या ठिकाणी पोहोचतात. गोव्यात याच अर्थाने मी म्हणते की सार्वजनिक वाहतुकीत सुधारणाही करावीच लागेल. शिवाय उद्योगात काम करू पाहणाऱ्या वर्कफोर्ससाठी निवास व्यवस्थाही करावी लागेल. पणजी व परिसरात निवास करणे कर्मचाऱ्यांना परवडत नाही. तो महाग आहे. जो गोव्यात काम करू पाहतो, तो निवासाचीही अपेक्षा करत असतो. त्याकडे सर्वांनाच लक्ष द्यावे लागेल. गोव्यात आयटी उद्योगाविषयी मी जास्त लिहीत नाही, कारण येथे आयआयटीलादेखील विरोध होतोय, हे मी वर म्हटलेलेच आहे. आम्ही आयटीची बस अगोदरच मिस केली आहे. पण अजून वेळ गेलेली नाही. गोव्यात फार्मा उद्योगाचे भवितव्य मात्र चांगले आहे. फार्मा उद्योगाला प्रोत्साहन द्यायलाच हवे.
गोव्यात खाण धंदा बंद झाल्यानंतर आता नव्याने तो पूर्णपणे रुळावर आलेला नाही. तो येण्यास वेळ लागेल. पर्यावरणाचे हितरक्षण करून खाण धंदा करता येतो. पूर्वीपासून गोव्यातील कंपन्या तसे करत आल्या आहेत. आताच्या खाण धंद्यासमोर आव्हाने आहेत. पूर्वी एकेकाळी चीनमधून मोठी मागणी आल्यानंतर व खनिजाला जो मोठा दर प्राप्त झाला होता, तशी स्थिती आता नाही. कदाचित तो काळ पुन्हा येणारही नाही. मात्र चीनमध्ये खनिजाला मोठीच किंमत वाढल्याने एकेकाळी कोणत्याही प्रकारे खाण धंदा काहींनी पुढे रेटला. तो काळ गेला,
आता गोव्यात पर्यटन व्यवसाय अधिक मजबूत करावा लागेल. पर्यटन क्षेत्रात अधिक रोजगार संधी निर्माण कराव्या लागतील. महिला आज सर्व क्षेत्रांत पुरुषांसोबत काम करत आहेत. महिला कुठेच कमी पडत नाहीत. महिलांसाठी सुरक्षित वातावरण कायम ठेवणे ही पुरुषांचीही जबाबदारी आहेच. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते.
Web Summary : Goa needs better education, infrastructure, and transport for industrial growth. IIT opposition hinders progress. Focus on pharma, tourism, and safe workplaces for women to boost Goa's economy. Public transport improvements are crucial.
Web Summary : गोवा को औद्योगिक विकास के लिए बेहतर शिक्षा, बुनियादी ढांचे और परिवहन की आवश्यकता है। आईआईटी का विरोध प्रगति में बाधा डालता है। गोवा की अर्थव्यवस्था को बढ़ावा देने के लिए फार्मा, पर्यटन और महिलाओं के लिए सुरक्षित कार्यस्थलों पर ध्यान दें। सार्वजनिक परिवहन में सुधार महत्वपूर्ण है।