लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: महिलांनी व्यवसाय व उद्योग क्षेत्रात अधिक प्रमाणात पुढे यावे, यासाठी केवळ आर्थिक प्रोत्साहन (इन्सेंटिव्ह) जाहीर करणे पुरेसे नाही. महिलांना काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखता यावा, यासाठी सार्वजनिक वाहतूक, राहण्याची व्यवस्था, क्रेशसारख्या सुविधा आणि सुरक्षित कामाचे वातावरण अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत व्ही. एम. साळगावकर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि उद्योजिका स्वाती शिवानंद साळगावकर यांनी व्यक्त केले.
महिला दिनानिमित्त पणजी येथील 'लोकमत' कार्यालयात आयोजित विशेष संवादावेळी बोलत होत्या. आज महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये महिलांचे शिक्षणाचे प्रमाण पुरुषांइतकेच वाढले आहे. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग सुरू करणे किंवा नोकरीच्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या महिलांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
साळगावकर म्हणाल्या, नोकरी किंवा व्यवसाय करताना महिलांसमोर काही मूलभूत अडचणी असतात. या समस्या दूर केल्यास महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पुरुष सहकाऱ्यांचीही तितकीच जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे आणि स्वावलंबी व्हावे यासाठी सरकारकडून सर्वसमावेशक व दीर्घकालीन धोरणाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखणेही महिलांसाठी मोठे आव्हान ठरते. लहान मुले असतील तर त्यांची काळजी कोण घेणार, घरी वयोवृद्ध पालक असतील तर त्यांचा सांभाळ करून कामावर कसे जायचे, असे प्रश्न अनेक महिलांसमोर उभे राहतात.
वडिलांकडून मिळाले प्रोत्साहन
स्वाती साळगावकर यांनी विदेशात वास्तुविशारद (आर्किटेक्चर) विषयाचे शिक्षण घेतले. मात्र परदेशात स्थायिक होण्याचा विचार कधीच केला नाही. त्यांच्या कुटुंबातील महिला पूर्वी कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय नव्हत्या. मात्र वडील शिवानंद साळगावकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वाती यांना व्यवसायात येण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्या विश्वासामुळे आणि मार्गदर्शनामुळेच आपण आज व्यवसायाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणात येण्याचा विचार नाही
सध्या उद्योजक आणि राजकारण यांचे काहीसे समीकरण तयार होताना दिसत असले तरी मला किंवा माझ्या वडिलांना राजकारणात येण्याची कधीच इच्छा नव्हती. त्यामुळे राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसून व्यवसायावरच पूर्ण लक्ष केंद्रित करणार असल्याचेही स्वाती साळगावकर यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Women entrepreneurs need infrastructure like safe transport and childcare, says Swati Salgaocar. Addressing work-life balance and secure environments are crucial for greater female participation in business. Comprehensive, long-term government policies are essential to empower women.
Web Summary : महिला उद्यमियों को सुरक्षित परिवहन और शिशु देखभाल जैसी बुनियादी ढाँचे की ज़रूरत है, स्वाति सालगांवकर का कहना है। कार्य-जीवन संतुलन और सुरक्षित वातावरण व्यवसाय में महिलाओं की अधिक भागीदारी के लिए महत्वपूर्ण हैं। महिलाओं को सशक्त बनाने के लिए व्यापक, दीर्घकालिक सरकारी नीतियां आवश्यक हैं।