लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्य सरकारने आरोग्य क्षेत्रात आधुनिक सुविधांसह अनेक दर्जेदार सुविधा उपलब्ध केलेल्या असूनही ग्रामीण भागातील महिला आजही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करावी. तसेच गंभीर आजारांबाबत सतर्कता बाळगावी. प्रत्येक पंचायत टीबी मुक्त व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न आहे. यासाठी गावोगावी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन, तसेच राज्यातील सर्व तालुके, शहरात आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सोबत साडेचार लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रत्येक कुटुंबासाठी उपलब्ध झालेले आहे. या लाभ घेत आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे-साखळी येथे केले.
गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथी, ग्रामपंचायत हरवळे, कामाक्षी देवी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जेसीआय साखळी यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी आणि होमिओपॅथिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पंचायत सभागृहात करण्यात आले होते. तेव्हा, मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आरोग्य धन संपदा, हे जपा
पैसा कमावण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक ठिकाणी गंभीर आजार रौद्ररूप धारण करतात. प्राथमिक स्तरावर रोग तपासणी केल्यास कॅन्सरसारखे रोग शंभर टक्के बरे करणे शक्य आहे. त्यामुळे 'आरोग्यमं धन संपदा' हा मंत्र जपून प्रत्येकाने आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
होमिओपॅथी, अॅलोपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार अशा अनेक वैद्यकीय सुविधा सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत. तसेच, उपचारासाठी आरोग्य कार्डच्या माध्यमातून सुरक्षा कवच उपलब्ध केले आहे.
प्रत्येक पंचायत ज्याप्रमाणे कचरा मुक्त करण्याचा संकल्प आहे त्याच धर्तीवर प्रत्येक पंचायत टीबी रोगमुक्त करणे हा संकल्प जपण्यासाठी कचरा मुक्त परिसर याबाबत जागृती होणे गरजेचे आहे.
यावेळी व्यासपीठावर सरपंच गौरवी नाईक, भाजप मंडळ अध्यक्ष रामा रामा नाईक, देमगो मळीक, अजय मळीक, ममता दिवकर, अंकिता मळीक, दिनेश काळे, तसेच वैद्यकीय पथक उपस्थित होते. सरपंच गौरवी नाईक यांनी पंचायत क्षेत्रात आरोग्य शिबिर आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना रोगमुक्त व कचरा मुक्त पंचायतीचा संकल्प केला.