Goa Election 2022: देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अपयशी! उत्पल पर्रिकरांचा पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 05:43 PM2022-01-27T17:43:26+5:302022-01-27T17:44:08+5:30

Goa Election 2022: उत्पल पर्रिकरांनी पणजीत उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसच्या उदय मडकईकरांसह शेकडो समर्थक उपस्थित होते.

goa election 2022 utpal parrikar files candidature from Panaji as an independent | Goa Election 2022: देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अपयशी! उत्पल पर्रिकरांचा पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

Goa Election 2022: देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अपयशी! उत्पल पर्रिकरांचा पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

Next

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Goa Election 2022) राजकीय रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यातच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी सर्व पर्यायांना बाजूला ठेवून पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस नेते उदय मडकईकरही उत्पल यांच्यासोबत होते. 

उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शेकडो समर्थकांनी उपस्थिती लावत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. उत्पल पर्रिकर यांच्यासह भाजपवर नाराज होऊन सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही मांद्रे मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय विद्यामान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपकडून साखळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप नेते आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हजर होते. 

उत्पल यांना वाढता पाठिंबा

भाजपने दिलेले सर्व पर्याय नाकारल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी उत्पल यांनी पणजीतील अन्य पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. पैकी काँग्रेसचे नेते उदय मडकईकर यांनी उत्पल यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच त्यांच्यासह निवडणुकीचा प्रचारही करणार असल्याचे स्पष्ट केले. उत्पल यांनी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचेही आशीर्वाद घेतले आहेत. उत्पलची उघड बंडखोरी तसेच वेगवेगळ्या घटकांकडून त्यांना मिळणारा वाढत पाठिंबा पाहता बाबूश यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. 

दरम्यान, भाजपचे नेते व प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनीही पक्षाला रामराम केला असून, उत्पल यांना समर्थन दिले आहे. स्वच्छ राजकारण व्हावे व गोव्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असलेल्या उत्पल पर्रीकर यांना माझा पाठिंबा आहे. उत्पलसाठी पूर्णपणे काम करता यावे, यासाठी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडले आहे, असे सांगत नाईक यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली आहे. 
 

Web Title: goa election 2022 utpal parrikar files candidature from Panaji as an independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.