लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाऊसाहेब बांदोडकर हेच राज्याचे खरे भाग्यविधाते आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सुरुवातील अनेक वर्षे सत्तेत येऊ शकला. भाऊसाहेबांमुळे राज्यात शिक्षणाचा पाया रोवला गेला. ज्या अनेक विकास योजना त्यांनी राबविल्या त्याचा फायदा आज राज्याला होत आहे, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
मंत्री ढवळीकर यांनी मंगळवारी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने पणजीत जूने सचिवालय परिसरात असलेल्या भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनीही पणजीत उपस्थित राहत भाऊसाहेबांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबत मुख्य सचिव व्ही. कांडावेलू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मिरामार येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचे काम विविध कारणांमुळे प्रलंबित आहे. परंतु, मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन जीएसआयडीसीकडून देण्यात आले आहे. किनाऱ्यावरच असल्याने येथे अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. पण येणाऱ्या काळात नक्कीच ती पूर्ण होईल, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
आयोग नाही, तर बीएलओ जबाबदार
सध्या मते चोरीचा विषय चर्चेत असून, त्यावर बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, मतदारांमधील तफावत ही गट विकास अधिकारी (बीएलओ) स्तरावर होते आणि ती पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या पातळीवर सोडवता येत नाही. कर्नाटकमध्ये मतदारांच्या यादीत तफावत झाल्याचे समोर येत आहे. इथे काय भाजप सत्तेत नाही, तिथे काँग्रेस सत्तेत आहे आणि बीएलओ राज्य सरकारच्या अंतर्गत काम करतात, त्यामुळे पक्षाला किंवा केवळ निवडणूक आयोगाला दोष देऊन काहीच फायदा नाही, त्यापेक्षा बीएलओ स्तरावर चांगले काम झाले पाहिजे.
भाऊसाहेबांकडून विकासाची पायाभरणी : शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो
कुठलीही इमारत किंवा बांधकाम घट्ट राहण्यासाठी त्याचा पाया मजबुत असणे गरजेचे आहे. तसेच राज्याच्या बाबतीतही आहे. आम्ही गोमंतकीय याबाबत खूप नशीबवान आहोत की, आम्हाला भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासारखे पहिले मुख्यमंत्री मिळाले. त्यांनीच राज्याच्या विकासाचा पाया रचला आणि आमचे राज्य समृद्धीकडे वळले. त्यांनीच शिक्षण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, उद्योग, वाहतूक व इतर साधन सुविधा योग्य प्रकारे भविष्याचा वेध घेत राज्यात आणल्या. ज्याचा फायदा आज गोव्याला होत आहे, असे शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.