लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अटल आसरा योजनेअंतर्गत नवी घर बांधणीसाठी दिली जाणारी रक्कम अडीच लाखांवरुन लाख रुपये तर घर दुरुस्तीसाठी दिली जाणारी रक्कम दीड लाखांवरुन ५ लाख रुपये करावी अशी मागणी प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी केली.
समाज कल्याण खात्यावरील सभागृहात अनुदानीत मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. अटल आसरा योजना ही समाज कल्याण खात्याची महत्वाची योजना आहे. मात्र या योजनेचे अनेक अर्ज खात्याकडे प्रलंबित आहेत. अर्ज त्वरित निकाली काढून अर्जदारांना लाभ मिळावा असेही त्यांनी नमूद केले.
गावडे म्हणाले की, या योजने अंतर्गत नवे घर बांधण्यासाठी २.५० लाख रुपये तर घर दुरुस्तीसाठी १.५० लाख रुपये दिले जातात. आर्थिकदृष्टया कमजोर घटकांसाठी योजना फायदेशीर आहे. मात्र या योजनेसाठी अर्ज करुनही बरेच महिने त्यासाठीचे अर्ज खात्याकडे प्रलंबित आहेत. आपण स्वतः खात्याचे संचालक तसेच कर्मचाऱ्यांकडे त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. सध्या या योजनेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले असले तरी काही तांत्रिक कारणांमुळे तो बंद आहे. त्यामुळे योजनेचे सध्याचे प्रलंबित अर्ज मंजूर करावेत. तसेच नवे घर, घर दुरुस्तीसाठी दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ करावी.
खात्यांदरम्यान समन्वय हवा
अटल आसरा योजनेसाठीचे अर्ज स्विकारताना समाज कल्याण खात्याने कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करावी. अन्यथा जेव्हा हे अर्ज पुढील प्रक्रियेसाठी बीडीओंकडे जातात, तेव्हा ते परत पाठवले जातात. यामुळे अर्जदारांना त्रास होतो. त्यासाठी खात्यांदरम्यान समन्वय हवा असे आमदार गोविंद गावडे यांनी नमूद केले.