लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारला कोणाचीही जमीन हडप करायची नाही. उलट राज्यातील भू-बळकाव प्रकरणांत सरकारने एसआयटी स्थापन केली व ७५ संशयितांना आतापर्यंत अटक झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
वारसा नसलेल्या मालमत्तेच्या विधेयकावरून सभागृहात काल गदरोळ झाला. वारसा नसलेल्या मालमत्ता कोणत्या निकषाच्या आधारावर तुम्ही ठरवणार, अशा मालमत्ता सरकार कशा ताब्यात घेऊ शकते, हा एकप्रकारचा जमीन हडप करण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधी आमदारांनी केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.
राज्यातील भू-बळकाव प्रकरणी सरकार कारवाई करीत आहे. या प्रकरणात आतापर्यंत २२ गुन्हें नोंद झाले आहेत. भू-बळाकाव प्रकरणी ७५ संशयितांना अटक झाली आहे. यात सहा सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
काही प्रकरणांमध्ये आरोपत्र न्यायालयात सादर केले असून मुख्य संशयित सुलेमान यालाही गोवा पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वीच्या सरकारने भू बळकाव प्रकरणी कारवाई केली नाही. मात्र आम्ही केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
न्यायालयात आव्हान द्या
वारसा नसलेल्या मालमत्तेबाबत विधेयक आणून आम्ही लोकांच्या जमिनी हडप करणार, असा आरोप चुकीचा आहे. सरकारला लोकांच्या जमिनी सुरक्षित ठेवायच्या असून त्यासाठी विधेयक आणले आहे. जर विधेयकाला विरोध असेल तर न्यायालयात न्यायालयात आव्हान द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा यांना सुनावले.