लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपतर्फे आमदार गणेश गावकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर केला. याप्रसंगी सत्ताधारी मित्रपक्ष मगोपचे दोन्ही तसेच तिन्ही अपक्ष आमदारही उपस्थित होते. गावकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.
दरम्यान, गावकर यांना पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. रमेश तवडकर सभापतिपदाचा राजीनामा देऊन मंत्री बनल्यानंतर हे पद रिक्तच आहे. नवीन सभापती निवडण्यासाठी २५ रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी, दि. २४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत आहे. विरोधी गटातर्फे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी याआधीच भरला.
मंत्री आमदारांची उपस्थिती
गावकर यांनी विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांच्याकडे अर्ज सादर केला, तेव्हा आरोग्यमंत्री विश्वजित राणे, बांधकाम मंत्री दिगंबर कामत, पशू संवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार दिव्या राणे, आमदार दाजी साळकर आदी उपस्थित होते.
बहुमताने विजय निश्चित : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती. पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, 'सत्ताधारी सर्वजण एकत्र असून गावकर यांचा बहुमताने विजय होईल हे निश्चित आहे.' अर्ज भरताना मित्रपक्ष मगोपचे दोन्ही आमदार तसेच तिन्ही अपक्ष आमदार उपस्थित होते, याचा सावंत यांनी उल्लेख केला.
असे आहे बलाबल
४० सदस्यीय विधानसभेत भाजपचे स्वतःचे २८ आमदार आहेत. तर मित्रपक्ष मगोपचे दोन व अपक्ष तीन अशा पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. विरोधी बाकावर काँग्रेसचे ३, आपचे २ व गोवा फॉरवर्ड आणि आरजीचा १ असे ७ आमदार आहेत.