पणजी : गांधी जयंतीदिनी २ आॅक्टोबरला सरकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता कार्यालयात हजर राहून दोन तास साफसफाई करावी, असे परिपत्रक नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आर. के. श्रीवास्तव यांनी सरकारच्या आदेशावरून काढले असून यामुळे एरव्ही या दिवशी सुट्टीचा आनंद घेणाऱ्या सरकारी सेवकांचा हिरमोड झाला आहे. कर्मचाऱ्यांना सकाळी ठिक ९ वाजता कार्यालयात हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोदी सरकारनेही केंद्रीय कर्मचाऱ्यांना गांधी जयंतीदिनी कार्यालयात हजर राहून साफसफाई करावी, असा आदेश काढला आहे. त्यामुळे धड सुट्टी नाही आणि धड काम नाही, अशी कर्मचाऱ्यांची स्थिती झाली आहे. राष्ट्रव्यापी स्वच्छ भारत उपक्रमाचा भाग म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवशी साफसफाई बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांना विचारले असता, आपण अद्याप हे परिपत्रक वाचलेले नाही. सरकारने सुट्टी रद्द केलेली असल्यास कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
गांधी जयंतीदिनी करा कार्यालये स्वच्छ!
By admin | Updated: September 30, 2014 01:14 IST