लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गावडोंगरी-काणकोण येथील बाबू वेळीप हा स्वातंत्र्य सैनिक पूर्णपणे दुर्लक्षित राहिला व हलाखीचे जीवन जगत असल्याची बातमी 'लोकमत'ने दिल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने या बातमीची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी आवश्यक प्रक्रिया सुरू केली व आता लगेच या स्वातंत्र्यसैनिकाला १० लाख रुपयांचा धनादेश सरकार देणार आहे. तसेच आता ६४ वर्षांनंतर त्याला दरमहा स्वातंत्र्यसैनिकांसाठींची पेन्शन सुरू केली जाणार आहे.
वेळीप हे सध्या मास्तीमळ येथे राहतात. त्यांनी गोवा मूक्ती लढ्यात खूप योगदान दिले. पण त्यांना कधीच पेन्शन सुरू झाली नाही. शिवाय ते चांगले गायकही आहेत. त्यांचे जीवन अत्यंत बिकट असल्याची बातमी 'लोकमत'चे खोतीगावचे बातमीदार देवीदास गावकर यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी लगेच दखल घेऊन आवश्यक प्रक्रिया सुरू केली.
काल रात्री मुख्यमंत्र्यांनी 'लोकमत'च्या संपादकांना सांगितले की, ते खरोखरच स्वातंत्र्यसैनिक असल्याची खात्री आपण करून घेतली आहे. 'लोकमत'ची बातमी खरी असून आपण त्या स्वातंत्र्यसैनिकाला १० लाखांचे अर्थसाहाय्य देईन व दर महिन्याला त्यांना पेन्शनही सुरू करीन. लगेच ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा १९६१ साली मुक्त झाला, पण ६४ वर्षांनी आता 'लोकमत'ची बातमी व मुख्यमंत्री सावंत यांनी घेतलेली दखल यामुळे स्वातंत्र्यसैनिकाला पेन्शन मिळणार आहे.