लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कुडचडे-काकोडा येथील राष्ट्रीयीकृत बँकेत ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावरून परस्पर पैसे काढून आपल्या खात्यात ट्रान्सफर करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी कुडचडे पोलिस स्थानकात मंगळवारी तीन तर बुधवारी एक असे चार गुन्हे झाले आहेत. एकूण १७ तक्रारींचे अर्ज आले आहेत. या तक्रारींनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातील एकूण एक कोटी ५९ लाख ५१ हजार रुपये हडपल्याचे उघड झाले आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी केपेचे उपअधीक्षक सागर एकोस्कर, पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण उपस्थित होते.
याप्रकरणी संशयित तन्वी वस्त (कुडचडे) व सेंट्रल बँकेचा व्यवस्थापक आनंद गणपत जाधव (रा. सातारा-महाराष्ट्र) यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी सायंकाळी त्यांना मडगाव पोलिस स्थानकात अधीक्षकांसमोर चौकशीसाठी आणण्यात आले होते.
अधीक्षक सावंत यांनी सांगितले की, 'तन्वी ही बैंक कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु ती बँकेत नोकरी करत नव्हती. वृद्धांना बँक खात्यातील पैसे एफडीमध्ये ट्रान्सफर करण्यात येतील, असे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात ज्या खातेधारकांचे पैसे होते, त्यांना एफडी सर्टिफिकेट मिळाले नाहीत. तसेच तन्वीने सोने गहाण ठेवून सुमारे २५ लाख रुपये बँकेमधून काढले होते.
या प्रकरणातील तक्रारदार महिला ही हृदयरुग्ण असल्याने तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्यांचा मुलगा विदेशात कामावर आहे. त्यामुळे तक्रार केल्यावर आपल्याला पोलिस स्थानकात जावे लागेल या भीतीने त्या महिलेने तक्रार करण्यास विलंब केला' असे पोलिस अधीक्षक सावंत यांनी सांगितले. यासाठी आपला मुलगा येईपर्यंत थांबा असे ती वृद्ध महिला सांगत होती. यासंबंधीची पहिली तक्रार २४ नोव्हेंबर रोजी पहिली तक्रार आली होती' असे त्यांनी स्पष्ट केले.
अधिकारांचा गैरवापर...
दिनेश कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित तन्वीने विविध खातेधारकांच्या खात्यांमधून एफडी करण्याची सबब सांगून सेंट्रल बैंक व्यवस्थापकाने अधिकारांचा गैरवापर केला. सुमारे २९ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.