लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : मगो पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहे. मगो सरकारचा घटकपक्ष आहे आणि मी सध्या तरी मगो पक्षातच आहे. निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. या काळात काहीही होऊ शकते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे मगोचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मांद्रे येथील भाजप मेळाव्यात पक्षाध्यक्ष दामू नाईक यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघ भाजपतर्फेच लढू अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार आरोलकर यांनी वरील माहिती दिली. विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये होणार आहेत. दरम्यानच्या काळात काय होईल, हे सांगता येत नाही; कारण कुठलीही गोष्ट शाश्वत नसते. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. पुढे काय बदल होतील अथवा होऊ घातले आहेत, हे आताच सांगू शकत नाही. दोन वर्षांत मांद्रे मतदारसंघात जास्तीत जास्त विकासकामे कशी होतील याकडे सध्या तरी मी लक्ष पुरविणार आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेकडे कसे पोहोचता येईल; त्यांना कशी मदत करता येईल, याचा आम्ही विचार करू. समांतरपणे आपल्या पक्षाचे कामही करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक पक्षनेतृत्व आपापले काम करीत राहील, असे मला वाटते, असेही आमदार आरोलकर यावेळी बोलताना म्हणाले.
पोटनिवडणुकीपासून कार्यकर्तेच माझ्याबद्दल काय तो निर्णय घेत आले आहेत. सध्या तरी मी मगो पक्षातच आहे. पुढे काय करायचं याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
इतर पक्षनेत्यांनी भाजपकडून शिकावे
आमदार आरोलकर म्हणाले, मगो पक्षाची युती भाजपशी आहे. आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेचे वाटेकरी आहोत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे. मांद्रे मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांचे खास लक्ष आहे. आमचेही त्यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. काल पक्षाध्यक्षांनी केलेले वक्तव्य त्यांच्या पक्षाशी निगडित आहे. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अभिमान असायलाच हवा. इतर पक्षनेत्यांनीही भाजपकडून शिकण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षाने सतत आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्कात असायला हवे. त्यांचे मनोबल वाढवायला हवे. भाजपने बुधवारच्या मेळाव्यात ते केले आहे. आपली मते टिकून ठेवण्याबरोबरच मताधिक्य वाढविण्याची गरज आहे.
'त्यात गैर काय?'
काल मेळाव्यात आपलाच पक्ष मांद्रेत जिंकेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला. तसे व्यक्त होणे साहजिक आहे. सत्तेवर आपलाच पक्ष यावा, हे स्वप्न बाळगणे अजिबात चुकीचे नाही, असे सांगून आरोलकर म्हणाले, मगो पक्षालाही तसे वाटणे साहजिक आहे. प्रत्येकाला असेच वाटते की, आपला पक्ष बहुमताने पुढे यावा. कालचीही घोषणा त्यातूनच झाली. त्यांनाही वाटते की, मांद्रेत कमळ फुलले त्यात गैर काय? असा सवालही त्यांनी केला.
मात्र मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत मतदार निर्णय घेत असतो. कुणाबरोबर जावे, कुणाला मतदान करावे. त्याप्रमाणे कुठे जावे, कुणाबरोबर राहावे याचा योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. प्रत्येकाने आपला पाया मजबूत करायला हवा. विकासकामे करायला हवीत. तसे झाल्यास आपण निश्चितच निवडून येऊ शकतो. मग कोणताही पक्ष अशा उमेदवाराचा विचार करील, असेही आरोलकर यांनी सांगितले.