लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा जरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असला, तरीही राज्यात अजूनही अशा माहीत नसलेल्या जागा आहेत, त्या ठिकाणी चित्रिकरण करून तो भाग सर्वांसमोर आणावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
गोवा राज्य चित्रपट महोत्सव २०२५च्या १०व्या, ११व्या आणि १२व्या आवृत्तीचे उद्घाटन गुरुवारी (दि. १४) आयनॉक्समध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार व ईएसजीच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, महापौर रोहित मोन्सरात, गायक जॉली मुखर्जी, अभिनेता महम्मद अली व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोंकणी चित्रपट जागतिक पातळीवर न्या
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोव्याची ओळख ही कोंकणीमुळे आहे. प्रत्येकाला आपल्या राज्यातील स्थानिक भाषा महत्त्वाची असते. त्यामुळे कोंकणीप्रमाणे मराठी चित्रपट तयार करायलाही सरकार अनुदान देत असते. त्यामुळे गोव्याची कांतारा, नाटके जशी जागतिक पातळीवर पाहिली जातात, तसेच गोव्याचे चित्रपटही जागतिक पातळीवर गेले पाहिजेत.
कोंकणी चित्रपटात काम करीन : अली
प्रसिद्ध अभिनेते महम्मद अली यांनी या गोवा चित्रपट महोत्सवाचे कौतुक केले. आपण देशातील विविध भाषांमध्ये चित्रपटात काम केले आहे. जर मला कोंकणी चित्रपटात संधी मिळाली, तर चित्रपटात आपण काम करायला तयार आहे. तसेच त्यांनी आपल्याकडून कोंकणी चित्रपटासाठी काय मदत हवी असल्यासही आपण करायला तयार असल्याचे सांगितले.
आगळ्या वेगळ्या पद्धतीने उद्घाटन
चित्रपटाचे उद्घाटन आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेला गायक जॉली मुखर्जी यांचा संगीत कार्यक्रम पार पडला. तसेच मुकेश घाटवळ यांचा सोलो बँड परफॉर्मन्स आणि विनोदी कलाकार सागर कारंडे व अंकुर वाधवे यांचा हास्याविष्कार कार्यक्रमाने रसिकांचे मनोरंजन केले.
कार्यशाळा आणि मास्टरक्लास
पणजी येथील मॅकेनिज पॅलेस थिएटर आणि आयनॉक्स येथे चित्रपटांचे प्रदर्शन होईल. फिचर फिल्म विभागात २१ तर नॉन-फिचर विभागात ७ पुरस्कारांसाठी अनुक्रमे १९ फिचर व ४ नॉन-फिचर चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. महोत्सवात निलाभ कौल, पंकज सक्सेना, ज्येष्ठ अभिनेते कंवरजीत पेंटल व चिताह यज्ञेश शेट्टी यांसारख्या ख्यातनाम व्यक्तिमत्त्वांच्या कार्यशाळा व मास्टरक्लास होणार आहेत.
वर्षा उसगावकर यांना जीवनगौरव
यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना दिला जाणार आहे. सदर पुरस्कार रविवार दि. १७ रोजी दिला जाईल. चित्रपटप्रेमींनी गोव्याच्या या बहुरंगी सिनेमोत्सवाचा भाग व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.esg.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.