पणजी : आर्थिक डबघाईस आलेल्या राज्य सरकारने प्राप्तीचे नवे मार्ग शोधताना कोणालाही सहीसलामत सुटू दिलेले नाही. समुद्र चाळून उपजीविका चालवणाऱ्या मच्छीमारांच्या जाळी तसेच अन्य उपकरणांवर कर वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. जाळ्यांच्या नोंदणीचे शुल्क शंभर टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. यासंबंधी अधिसूचना जारी करून तीस दिवसांच्या आत हरकती व सूचना मागविल्या आहेत. तीन सिलिंडरच्या यांत्रिकी बोटींना जाळे नोंदणीसाठी आता १00 रुपयांऐवजी २00 रुपये बाहेर काढावे लागतील. चार सिलिंडरच्या यांत्रिकी बोटींना ३00 रुपये, तर त्यापेक्षा अधिक सिलिंडरच्या यांत्रिकी बोटींना ५00 रुपये मोजावे लागतील. रापणीद्वारे मासेमारी करणाऱ्यांना २00 मीटरपर्यंतच्या जाळ्यांना १५0 रुपये बाहेर द्यावे लागतील. आधी हे शुल्क केवळ ५0 रुपये होते. नद्यांमध्ये फुटावणी पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना जाळ्यांचे नोंदणी शुल्क ८0 रुपये, मानशींवर मासेमारी करणाऱ्यांना जाळे नोंदणीसाठी १00 रुपये, इतकेच नव्हे तर खेकडे, कोळंबी आदी पकडण्यासाठी लावल्या जाणाऱ्या ट्रॅपवरही शुल्क २५ रुपयांवरून थेट ८0 रुपये केले आहे. (प्रतिनिधी)
मच्छीमारही ‘जाळ्यात’!
By admin | Updated: July 18, 2014 02:05 IST