पणजी : स्वाईन फ्लूच्या गोव्यातील पहिल्या बळीची नोंद झाली असून हाँगकाँगहून परतलेल्या नावेली येथील ३६ वर्षीय युवकाचा मडगावमधील एका खासगी इस्पितळात उपचार चालू असताना मृत्यू झाला. या युवकाचे नाव सिल्वेस्टर गोम्स असून तो नावेली येथे राहात होता. तो विदेशात जहाजावर कामाला होता आणि काही दिवसांपूर्वी तो हाँगकाँगमधून परतला होता. गोव्यात येण्यापूर्वीच त्याला एच१एन१चा (स्वाईन फ्लूचा) संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याला मडगाव येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या रक्ताचे चाचणीसाठी पाठविलेले नमुने एच१एन१साठी पॉझिटिव्ह ठरले होते. त्याच्यासह आणखी एका महिलेलाही स्वाईन फ्लू झालेला आढळला होता. महिलेची प्रकृती बरी झाल्याने तिला डिस्चार्जही देण्यात आला आहे. सिल्वेस्टरची प्रकृती अधिक ढासळल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बुधवारी त्याची प्रकृती आणखी बिघडली होती आणि त्याचे नंतर निधन झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. निधन झालेल्यासह गोव्यात आढळलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ५ झाल्याची माहिती आरोग्य खात्याचे साथरोग विभागाचे डॉक्टर उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली. २२ रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४ नमुन्यांचा अहवाल खात्याला मिळाला आहे. त्यात एकूण ५ जण पॉझिटिव्ह सिद्ध झाले होते. अजून ८ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी असून बुधवारी सायंकाळपर्यंत अहवाल अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
राज्यात स्वाईन फ्लूचा पहिला बळी
By admin | Updated: February 4, 2015 02:36 IST