वासुदेव पागी ल्ल पणजी गोवा मुक्तीनंतर राज्यात ज्या पहिल्या टप्प्यात ज्या काही मराठी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या त्यातील एक शाळा एकोशी-हळर्ण येथील सरकारी प्राथमिक शाळा होती. या शाळेची इमारत मागील आठवड्यात जमीनदोस्त झाली आहे. गोवा मुक्तीनंतर राज्यात सुरुवातीच्या काळात काही शाळा सुरू करण्यात आल्या. स्वातंत्र्यानंतर गोव्यात नेमकी पहिली शाळा कोणती सुरू केली याची नोंद शिक्षण खात्यातही उपलब्ध नाही; परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्यानुसार एकोशी येथील ही शाळा मुक्तीनंतर राज्यात ज्या शाळा सुरू करण्यात आल्या त्या पहिल्या मोजक्या शाळांपैकी एक मराठी शाळा होती. १९६५ च्या सुमारास ती सुरू करण्यात आली होती, असे तेथील जाणते लोक सांगतात. प्राथमिक शाळा म्हणून सुरू करण्यात आली होती; परंतु नंतर वर्ग वाढवून ७ वीपर्यंत करण्यात आले होते. पाचवी सहावी आणि सातवीचे वर्ग पूर्वीच बंद झाले होते. ८ वर्षांपूर्वी कमी पटसंख्येमुळे ही शाळा बंद करण्यात आली होती. नंतर एक-दोन वर्षे त्यात बालवाडीही चालू केली होती. नंतर तीही बंद झाली होती. त्यानंतर त्याच्या दुरुस्ती कामाकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या पावसाळ्यात शाळेच्या भिंतीत पाणी झिरपले होते. मागील आठवड्यात ती शाळा कोसळून पडली.
पहिली एक मराठी शाळा जमीनदोस्त
By admin | Updated: December 28, 2015 01:35 IST