लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : ग्रामीण पत्रकारांनी संशोधनात्मक पत्रकारितेवरभर द्यावा. पत्रकारांनी पुढाकार घेऊन सामाजिक क्षेत्रात सातत्याने घटनांचा पाठपुरावा करीत योगदान द्यावे. ग्रामीण पूर्णवेळ पत्रकारांना सर्व सुविधा देण्यासाठी सरकारतर्फे सर्वते सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
येथील रवींद्र भवनात रवींद्र भवन व ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने रमेश सावईकर, संतोष गोवेकर, सुनील फातर्पेकर, बबेश बोरकर या राज्यातील चार ज्येष्ठ ग्रामीण पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी राज्यातील ७० ग्रामीण पत्रकारांनाही गौरविण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, विश्वनाथ नेने, उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, उदय सावंत, रवीराज च्यारी आदी प्रमुख उपस्थित होते.
योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'ग्रामीण पत्रकारांना वृत्तांकन करताना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना मिळणारे मानधन हे अतिशय अल्प आहे. अशा परिस्थितीतही पत्रकार ग्रामीण भागात राजकीय, सामाजिक आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करत असतात. त्या पत्रकारांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व प्रयत्न आहेत. त्यासाठी काही योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. सरकारी योजना, ग्रामीण भागातील समस्या, चांगले उपक्रम यांचा वेध घेताना त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची सवय ग्रामीण पत्रकारांनी अंगीकारावी.
ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या साध्या राहणीमानाचा विशेष उल्लेख करत मुख्यमंत्री पत्रकारांना नावानिशी ओळखतात. त्यांची राज्याच्या ग्रामीण भागात मजबूत पकड असल्याचे मत व्यक्त केले.
विश्वनाथ नेने यांनी सामंत यांची मुलाखत घेतली. दत्ताराम चिमुलकर यांनी स्वागत केले. उदय सावंत यांनी प्रास्ताविक केले. दुर्गादास गर्दे यांनी सूत्रसंचालन केले.