लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/मोपा : महाराष्ट्राच्या सीमाभागातील जंगलातून हत्तीने काल, मोपा-पेडणेत प्रवेश करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. वन खात्याने तातडीने उपाययोजना करत या हत्तीला माघारी पाठवण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीम फिल्डवर उतरवली आहे.
या बिथरलेल्या टस्कराचे नाव 'ओंकार' असे असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात दोडामार्ग तालुक्यात या हत्तीने एकाच रात्रीत कित्येक एकर शेती पायदळी तुडवीत मोठी हानी केली. आता नवा मार्ग शोधत त्याने थेट गोव्यात प्रवेश केला आहे. धुडगूस घालणारा हा हत्ती भरदिवसाही मोकाट फिरत असून अंगावर धावून येत असल्याने लोक धास्तावले आहेत.
दोडामार्ग-तिलारी परिसरातून वाट चुकलेल्या 'ओंकार'ने सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे धनगरवाडी परिसरातून कडशी, मोपा भागातून गोव्यात प्रवेश केला. तो तेथून गावठणवाडा मोपा गावात स्थिरावला. या अनपेक्षित पाहुण्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ त्याला परत पाठवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शनिवारी पूर्ण दिवस हत्ती नेतर्डे धनगरवाडी परिसरातच घुटमळत होता. सिंधुदुर्ग वनविभाग अधिकारी, कर्मचारी, जलद कृती दलासह गोवा वनविभागाचे पथकही या परिसरात ठाण मांडून आहे.
हत्ती बनला आक्रमक
मोपा भागातील जंगलात अचानक अवतरलेला हा हत्ती आक्रमक बनून दिसेल त्याच्या अंगावर धावत असल्याने लोकांची भीतीने गाळण उडाली आहे. हा टस्कर शेती, बागायतीचीही मोठ्या प्रमाणात नुकसानी करण्याची शक्यता आहे. वन अधिकाऱ्यांनी वेळीच त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
असा आला हत्ती
तिलारी परिसरातील घोटगे, मोर्ले गावात हत्तींचा कळप सध्या धुमाकूळ घालत आहे. याच कळपातील ओंकार हा हत्ती शुक्रवारी कळणे, उगाडे गावातून डेगवे, डोंगरपालमार्गे नेतर्डे - धनगरवाडीत आला. सकाळी ११ वाजता हत्ती पाणवठ्याच्या ठिकाणी थांबला. दुपारी साडेतीननंतर तो डोंगरपाल, नेतर्डे परिसरातील जंगलात घुटमळत राहिला. काल सायंकाळपर्यंत तो नेतर्डेतच ठाण मांडून होता. मात्र, रात्री त्याने फकीरपाटो येथून कडशी नदीकिनाऱ्यावर गोव्यात प्रवेश केला.
तोरसेकडे वाटचाल
रविवारी सकाळी हत्ती मोपातील गावठणवाडा येथील राजन नाईक यांच्या काजू बागायतीमध्ये दिसला. तो मोपा, करमळी या भागातून उगवेकडे किंवा तांबोसेमार्गे तोरसेकडे जाण्याची शक्यता आहे. हत्ती माणसे दिसल्यास किंवा मोठा आवाज आल्यास त्या दिशेने धावून जातो.
रात्रीच्या वेळी उजेड किंवा दिवे पेटवल्यानंतरही तो २ आक्रमण करतो असा अनुभव आहे. हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या वनविभागाचे पथक आणि रॅपिड अॅक्शन फोर्स घटनास्थळी आहेत.
हत्तीकडून परिसरातील शेती बागायतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वनविभाग आणि स्थानिक प्रशासन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
'मी वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्देश दिले आहेत. या हत्तीला माघारी पाठवण्यासाठी वन अधिकारी आटोकाट प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सरकारची मदत घेऊन ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केली जात आहे. या हत्तीला महाराष्ट्रात परत पाठवले जाईल. - विश्वजित राणे, वनमंत्री.