पणजी : समुद्र पातळीवाढीमुळे राजधानीतील पाटो, फोन्ताइनास, नेवगीनगर, रायबंदर, सांतइनेज, कांपाल मिरामार, करंझाळे व दोनापावल या भागांना भविष्यात धोका असल्याचा इशारा दि एनर्जी अॅण्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (टेरी) संशोधनांती दिला आहे. या संस्थेने वर्षभर संशोधन करून हा निष्कर्ष काढला आहे. शहरातील रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ अ आणि पाटो पूलही धोक्याच्या छायेत आहे. निवासी, व्यावसायिक तसेच वारसादृष्ट्या महत्त्वाच्या वास्तू, चोडण येथील डॉ. सलिम अली अभयारण्य तसेच या भागातील खाजन जमिनी, मिठागरे, वाळूच्या टेकड्या, खाडी यांनाही धोका आहे. ‘टेरी’ने या अहवालाचा व्यवस्थापन डेटाबेस नुकताच मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. महापालिकेला त्यादृष्टीने तयारीला लागणे आवश्यक आहे. वरील संशोधन हवामान मॉडेलिंग तसेच जीआयएस आधारित विश्लेषणावरून करण्यात आले आहे. या भागातील पर्जन्यमान विचारात घेण्यात आले आहे. वारसा आणि पर्यटन, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा आणि गटार व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, सामाजिक पायाभूत सुविधा (शाळा, इस्पितळे), पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग आदी गोष्टीही विचारात घेतल्या आहेत. शहरातील महत्त्वाच्या वास्तू, खाती याबाबत सूची तयार करून या गोष्टी वाचवता येतील. दरम्यान, येत्या १0 आॅक्टोबर रोजी संस्थेतर्फे दिल्लीत ‘किनारी शहरांमधील हवामान’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत पणजी, तसेच विशाखापट्टणम शहरांबाबतचा अभ्यास अहवाल मांडला जाणार आहे. या शहरांचे हवामान धोका व्यवस्थापन धोरण निश्चित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
समुद्र पातळीवाढीमुळे पणजीतील काही भागांना भविष्यात धोका
By admin | Updated: September 29, 2014 17:08 IST