पणजी : डॉक्टरांसाठी अधिमान्यता ही सक्तीची असेल आणि त्याबाबतीत कोणत्याही कारणाखाली सवलत दिली जाणार नाही, असे आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी म्हटले आहे. गोवा मेडिकल कौन्सिल मेडिकल असोसिएशन आणि ब्रिटिश मेडिकल जॉर्नलच्या संयुक्त करारानुसार आता अधिमान्यतेसाठी लागणारे प्रशिक्षण आणि मूल्यांकन व्यवस्थाही आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गोवा मेडिकल कौन्सिल आणि ब्रिटिश मेडिकल जॉर्नल ग्रुपमध्ये करार करण्यात आला आहे. या करारानुसार गोव्यातील अॅलोपॅथी डॉक्टरसाठी अधिमान्यतेचे नूतनीकरण करण्यासाठी किंवा अधिमान्यता देण्यासाठी प्रशिक्षण व मूल्यांकन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शनिवारी पणजीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कराराच्यावेळी आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, गोवा मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर, ब्रिटिश मेडिकल जॉर्नलचे मार्केटिंग प्रमुख संदीप पंचुरे, गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळाचे डीनडॉ. प्रदीप नाईक, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पणजी शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद नेत्रावळीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, ज्ञानात भर टाकत राहणे हे डॉक्टरांसाठी आवश्यक असते आणि त्यासाठीच अधिमान्यतेची पद्धत तयार करण्यात आली आहे. आता त्यामुळे अधिमान्यतेसाठी कोणतेही निमित्त डॉक्टरांनी करू नये, किंबहुना तसे करताही येणार नाही; कारण ही सुविधा आॅनलाईनही उपलब्ध करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. ब्रिटिश मेडिकल जॉर्नल ग्रुपशी करार करून देण्यात आलेले ग्रेडिंग हे जागतिक दर्जाचे असल्याचा दावा ग्रुपचे मार्केटिंग प्रमुख पंचुरे आणिगोवा मेडिकल कौन्सिलचे अध्यक्षडॉ. साळकर यांनी केला. आवश्यक गुण मिळवून अधिमान्यता मिळविण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी सुविधा म्हणून गोवा मेडिकल असोसिएशनच्या वेबसाईटचे प्रतिकात्मक उद््घाटनही या वेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)
डॉक्टरना अधिमान्यता सक्तीची
By admin | Updated: April 19, 2015 01:06 IST