लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बरे-वाईट जे काही असेल ते बाहेर बोलू नका. प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस किंवा माझ्याकडे बोला. काही गैरसमज असतील तर ते पक्षांतर्गतच बोलून दूर करुयात, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऐकमेकांविरुद्ध बोलणाऱ्या मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांना दिला.
भाजपच्या सर्व ३६ नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचा सोमवारी मुख्यमंत्र्यांहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्यसभा खासदार अरुण सिंग, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर व दामू नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाला मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. त्यानंतर मार्च २०२५मध्ये पालिका निवडणुका होतील आणि २०२७मध्ये सर्वात मोठी विधानसभेची निवडणूक होईल. मंडळ अध्यक्ष सक्षम असेल, तर उमेदवार सहजपणे निवडून येतो. त्यामुळे मंडळ अध्यक्षांचीही तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे. आज जे मंडळ अध्यक्ष झालेले आहेत,
त्यातील ५० ते ६० टक्के कार्यकर्ते हे युवा मोर्चातून आलेले आहेत. सर्वजण तरुण आहेत. त्यांनी दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडून आगामी प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता मिळवून देणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ३६ मतदारसंघात आम्ही मंडळ अध्यक्ष निवडले. उर्वरित चार मतदारसंघातही अध्यक्ष नियुक्त करून शंभर टक्के मतदारसंघ पूर्ण करू. जुन्या मंडळ अध्यक्षांनी आता आपली जबाबदारी संपली, अशा समजूतीत राहू नये. त्यांनाही नवनवीन पदे मिळतील. नव्या मंडळ अध्यक्षांना मार्गदर्शन करण्याची व त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी जुन्या लोकांची आहे. भाजपमध्ये कार्यकर्ता हे सर्वांत मोठे पद आहे. त्यामुळे सर्वांनीच जबाबदारीने काम करावे.
दरम्यान, ४५ वर्षे वयोमर्यादा केल्यामुळे सुरुवातीला आमच्यासमोरही अडचण निर्माण झाली होती. मात्र, पक्षाने राष्ट्रीय स्तरावर घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे सर्वच राज्यांना तो लागू होतो. गोव्यातही त्याचे आम्हाला पालन करावे लागले. कार्यक्षम असेच मंडळ अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत. वयोमर्यादा आल्यानंतर काही जणांनी तर बूथ अध्यक्षपदावर आपण काम करतो, असे सांगितले, संदीप सूद, कमांडर पाध्ये यांनी आपणहून बूथ स्वीकारले.
पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस तथा राज्यसभा खासदार अरुण सिंग म्हणाले, 'पक्षामध्ये प्रत्येक काम सन्मानाचे काम असते. कोणीही आपल्याला कमी लेखू नये किंवा उच्चही मानू नये. परिवार म्हणून सर्वांना घेऊन पुढे जा. बूथ मजबूत करा, यश तुमचेच आहे'.
विधानसभेच्या तयारीला लागा
२०२७ची विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून कामाला लागा, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांना दिला. पक्षाने ४५ वर्षांखालील मंडळ अध्यक्ष दिले आहेत. भाजप आता तरुण झाला असून, ही युवा ब्रिगेड येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच सत्ता मिळवून देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
एकमेकांच्या साथीने काम करा
सन २०२२च्या निवडणुकीत सर्व मंडळ अध्यक्षांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले. त्यामुळेच भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकले. अनेकदा मंत्री, आमदारांना मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही. हे काम मंडळ अध्यक्षांनी चोखपणे बजावावे. काहीवेळा पक्ष उमेदवार बदलतो. त्यावेळीही कार्यकर्त्यांनी साथ द्यायला हवी. आमदारापेक्षाही मंडळ अध्यक्षाची जबाबदारी मोठी असते. त्याने मतदारांशी संपर्क ठेवणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.