पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी प्रथमच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर हे गांधी यांना भेटले, तेव्हा चोडणकर यांच्याकडे गांधी यांनी पर्रीकर आता कसे आहेत, अशी विचारणा केली व तब्येतीविषयी माहिती जाणून घेतली.मुख्यमंत्री सध्या दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेत आहेत. चोडणकर यांच्या वाचनात पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी जेवढी माहिती येते, तेवढे त्यांनी गांधी यांना सांगितले. चोडणकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांना भेटले. गोवा सरकारच्या कारभारावर तसेच विविध मंत्र्यांच्या प्रकरणांवर चोडणकर यांनी जोरदार टीका चालवली असून पणजीत काँग्रेसतर्फे मोर्चाही काढून चोडणकर यांनी सरकारविरोधी असंतोषाला धार चढविली आहे. चोडणकर हे प्रदेशाध्यक्ष होऊन काही महिने झाले तरी, राहुल गांधी यांच्याशी स्वतंत्रपणे बराच वेळ चर्चा करण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती. ती शुक्रवारी मिळाली.चोडणकर यांचे राहुल गांधी यांच्याशी गेले काही वर्षे चांगले संबंध आहेत. त्यामुळे फालेरो यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर लगेच चोडणकर यांना त्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. यापूर्वी चोडणकर यांनी दिल्लीतही काँग्रेसचे काम केलेले आहे. गोव्यात सत्ता बदल करण्याविषयी आम्ही चर्चा केलेली नाही किंवा त्या दिशेने कोणताच निर्णय घेतलेला नाही, असे चोडणकर यांनी लोकमतला सांगितले. आपण फक्त गोव्यातील सद्याची राजकीय स्थिती राहुल गांधी यांच्यासमोर ठेवली. गोव्यातील सध्याचे सत्ताधा-यांच्या बाजूचे राजकीय खत खत पूर्ण गोमंतकीयांना ठाऊक असून मी त्याबाबत गांधी यांना अधिक माहिती दिली आहे, असे चोडणकर म्हणाले.
राहुल गांधींकडून पर्रीकरांच्या आरोग्याविषयी विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 18:38 IST