लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांचा अखेर काल, गुरुवारी दोनापावल येथील राजभवनवर शपथविधी झाला. दोघांनाही मंत्रिपदाची शपथ राज्यपालांनी दिली. बहुतेक मंत्री या सोहळ्यात सहभागी झाले. पण आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो, गोविंद गावडे यांच्यासह मंत्री रवी नाईक व बाबूश मोन्सेरात हे गैरहजर होते. तर आमदार नीलेश काब्राल या शपथविधी सोहळ्याला उशिरा पोहचले.
राज्यपाल अशोक गजपती राजू यांनी मंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. दोघांनीही कोंकणी भाषेतून शपथ घेतली. लवकरच या दोघांना खाते दिले जाणार आहे. राजभवनवर दरबार हॉलमध्ये दुपारी १२ वाजता शपथविधी सोहळा पार पडला. तत्पूर्वी तवडकर यांनी सभापतिपदाचा राजीनामा विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांच्याकडे सादर केला. सोहळ्याला उद्योगपती श्रीनिवास धेंपो, त्यांची पत्नी गेल्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार पल्लवी धेंपो, सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, प्रशासनातील सचिव उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्यास मडगाव व काणकोणमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरबार हॉल खचाखच भरला होता. सावंत सरकारच्या मंत्रिमंडळातील विविध मंत्री तसेच आमदारांनी कार्यक्रमास उपस्थित लावली. मुख्य सचिव डॉ. व्ही कांडावेलू यांनी नियुक्तीचा आदेश वाचून दाखवला व त्यानंतर राज्यपालांनी या दोघांना शपथ दिली.
दरम्यान, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, दिगंबर कामत आणि रमेश तवडकर दोघेही अनुभवी आहेत आणि मंत्रिमंडळात त्यांची गरज होती. दोघांच्याही समावेशामुळे गोव्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, कामत यांना प्रदिर्घ अनुभव आहे आणि ते विधानसभेचे वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या समावेशामुळे मंत्रिमंडळ आता निर्णय घेण्याच्या आणि एकूणच प्रशासनाच्या बाबतीत अधिक मजबूत होईल. जे काही घडते ते चांगल्यासाठीच आहे.
अजूनही बरेच काही घडू शकते : दामू
शपथविधी सोहळ्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी राजकीय घडामोडींबद्दल बोलताना येत्या काळात अजून बरेच काही घडू शकते, असे संकेत दिले आहेत. मात्र यावर अधिक काही बोलण्याचे त्यांनी टाळले.
राज्याच्या विकासाला बळ मिळणार : विश्वजीत राणे
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही दोघांच्याही मंत्रिमंडळ समावेशाचे स्वागत केले असून ते म्हणाले की, सक्षम व्यक्तींचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. हा एक अत्यंत चांगला निर्णय आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे. हे दोघे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना सरकारमधील कामाकाजाचा मोठा अनुभव आहे. गोव्याच्या विकासाला चालना देण्यासाठी या दोन्ही मंत्र्यांचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिगंबर कामत व रमेश तवडकर यांचे मंत्रिमंडळात स्वागत केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी दोघांचेही अभिनंदन करतो आणि माझ्या मंत्रिमंडळात त्यांचे स्वागत करतो. तवडकर आणि कामत दोघेही जनतेच्या आणि गोव्याच्या विकासासाठी काम करतील. त्यांचा अनुभव स्वयंपूर्ण गोव्याच्या वाटचालीला निश्चितच बळ देईल.
काब्राल यांची उशिरा एन्ट्री
मुख्यमंत्री सावंत यांनी जूनमध्ये मंत्रिमंडळातून डच्चू दिलेले आमदार गोविंद गावडे हे शपथविधी सोहळ्यास आले नाहीत. तर सत्ताधारी आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो यांचीही शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती दिसून आली. तसेच आमदार निलेश काब्राल हे दिगंबर कामत यांनी शपथ घेतल्यानंतर पोहोचले.
आज किंवा उद्या होणार खाते वाटप
नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेले दिगंबर कामत व रमेश तवडकर यांना आज, शुक्रवारी किंवा उद्या, शनिवारी खाते वाटप केले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सर्वसाधारण प्रशासन विभाग खाते वाटपाचा आदेश काढणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात एक महत्त्वाचे व एक गौण अशी दोनच खाती दिली जाणार आहेत.
दिगंबर कामत हे स्वतःला सार्वजनिक बांधकाम खाते मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. बांधकाम खाते आता दोन विभागांमध्ये विभागले आहे. पेयजल व रस्ते आणि इमारती अशी ही खाती आहेत. दोन्ही विभाग आपल्याला मिळावेत यासाठी कामत यांचे लॉबिंग सुरु असल्याची चर्चा आहे.
तवडकरना क्रीडा खाते मिळू शकते, अशी चर्चा आहे. आदिवासी कल्याण तूर्त मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवणार आहेत. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आदिवासी वन निवासींचे सर्व जमीन हक्क दावे निकालात काढण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तवडकर यांनी पूर्वी मंत्री असताना क्रीडा खाते सांभाळले आहे. त्यांच्याकडे पर्यावरण किंवा कायदा व्यवहार ही खाती जाऊ शकतात.
आता कामतांकडे बहुमत : सरदेसाई
काँग्रेसच्या काळात दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात असलेले सात सहकारी आता सध्याच्या मंत्रिमंडळातही आहेत, यावरून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी टोला लगावला आहे. कामत त्यांच्याकडे आता मंत्रिमंडळात बहुमत आहे. २०१२ मध्ये लढलेल्या मूळ भाजप कार्यकर्त्यांनी आता राजकीयदृष्ट्या विश्रांती घेण्याची वेळ आली आहे.
विरोधकांचा बहिष्कार
विरोधी आमदारांना शपथविधी सोहळ्याचे व्हाट्सअॅपवर आमंत्रण पाठवण्यात आले होते. परंतु विरोधी आमदारांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला. 'मला व्हाट्सअपवर निमंत्रण मिळाले. परंतु मी गोव्याबाहेर असल्याने येऊ शकलो नाही, असे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी 'लोकमत'ला सांगितले. यावेळी आमदार विजय सरदेसाई यांनी कामत यांच्यावर टोलेबाजी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून मी पक्षासाठी काम केले आहे आणि अनेक आव्हानांना तोंड दिले आहे. मी नेहमीच लोकांसाठी आणि गोव्यासाठी काम केले आहे. २०२७ च्या निवडणुकीकडे पाहता, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला या महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवडले आहे याचा मला अभिमान वाटतो. - रमेश तवडकर, मंत्री.
तब्बल तेरा वर्षांनंतर, मला पुन्हा मंत्री होण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री सावंत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, बी एल संतोष आणि दामू नाईक यांच्या पाठिंब्यामुळे मला लोकांसाठी काम करण्यास आणि पक्ष बळकट करण्यास मदत होईल. - दिगंबर कामत, मंत्री.
प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या दिगंबर कामत व रमेश तवडकर यांच्या मंत्रिमंडळात समावेश होणे ही चांगली बाब आहे. या दोघांचाही सरकारला मोठा फायदा होणार आहे. - सुदिन ढवळीकर, वीजमंत्री.