लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळ फेररचनेची प्रतीक्षा आता संपली असून सभापती रमेश तवडकर व आमदार दिगंबर कामत यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित झाला आहे. उद्या, गुरुवारी दुपारी १२ वाजता शपथविधी होणार आहे. तर पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज सायंकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तवडकर उद्या सभापतिपदाचा राजीनामा देतील व उद्याच मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सभापतिपदी गणेश गावकर यांची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या जीएसटी कौन्सिल मंत्रिगटाच्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आज रात्री किंवा उद्या, गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री गोव्यात परतणार आहेत. त्यानंतर तवडकर व दिगंबर यांचा शपथविधी होणार आहे.
गोविंद गावडे यांना १८ जून रोजी मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळे एक पद आधीच रिक्त आहे. सिक्वेरा यांनी राजीनामा दिल्यानंतर आणखी एक पद रिक्त झाले आहे. आलेक्स सिक्वेरा हे आजारातून तसे अजून बरे झालेले नाहीत. आजारपण हेच सिक्वेरा यांच्या राजीनाम्याचे कारण सांगितले जात आहे. पक्षनेतृत्वाने नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. सिक्वेरा यांची कामगिरी अगदीच सुमार होती. या दोन रिक्त पदांवर तवडकर व दिगंबर यांची वर्णी लागणार आहे. दरम्यान, पर्तगाळ मठाच्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन दिगंबर कामत, उद्योगपती श्रीनिवास धंपो यांनीही पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.
जे पद सोपवले जाईल, त्याचा मान राखेन : गणेश गावकर
'लोकमत'ने आमदार गणेश गावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सभापतिपद असो किंवा मंत्रिपदाबाबत अद्याप माझ्याकडे कोणीच थेट बोलणी केलेली नाही. जे पद माझ्याकडे सोपवले जाईल, त्याचा यथोचित मान मी राखेन, असे सांगितले.
सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधून आठ आमदार फुटले. त्यातील मुरगावचे संकल्प आमोणकर हेही मंत्रिपदासाठी दावेदार होते. मुख्यमंत्र्यांनी वास्कोतील एका कार्यक्रमात आमोणकर यांना लवकरच चांगली बातमी मिळणार, असे जाहीर केले होते. परंतु मंत्रिमंडळ फेररचनेत त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे आमोणकर यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाते याचीही त्यांच्या समर्थकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.
संधीबद्दल आभार : दिगंबर कामत
मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू असताना कामत यांचे नाव निश्चित झाले आहे. याबाबत दिगंबर कामत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला कळविले आहे. उद्या, दुपारी १२ वाजता शपथविधी होणार आहे. या संधीबद्दल मी देवाचे आभार मानतो.
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार : तवडकर
पक्षाने आपल्यावर मंत्रिपदाची जबाबदारी देण्याचे निश्चित केल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. २९ मार्च २०२२ मध्ये मी विधानसभेच्या सभापतिपदाची जबाबदारी स्वीकारली. सभापतिपदावर कायमस्वरूपी राहावे, अशी निश्चितच माझी इच्छा होती. मात्र पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही. पक्ष संघटनेची गरज म्हणून जर त्यांनी माझ्यावर कुठली जबाबदारी दिली असेल तर मी ती त्यांचा आदेश म्हणून स्वीकारेन. पक्षाला माझ्या संघटनेच्या दृष्टीने कामाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आलेक्स सिक्वेरा म्हणाले...
मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामापत्रात वैयक्तिक कारणांमुळे आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभार मानतो. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आणि विभागीय कर्मचाऱ्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला. मी कायदा आणि न्यायपालिका, पर्यावरण, बंदरे आणि कायदेविषयक व्यवहार खात्याचा मंत्री म्हणून काम करताना माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांचे मी आभार मानतो.