लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली तालुक्यात विकासकामांचा सपाटा लावला आहे. संपूर्ण राज्याबरोबरच डिचोली तालुक्याला आधुनिक साज चढविण्यासाठी त्यांनी अनेक योजनांना मंजुरी दिली आहे.
डिचोलीत साकार होणारे भव्य प्रशासकीय संकुल आधुनिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ठिकाणी कदंब बसस्थानक दिरंगाईमुळे रखडले असले तरी आगामी सहा महिन्यांत ते पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. सरकारचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी सरकार खबरदारी घेत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
डिचोलीवासीयांना दोन वर्षात कला भवन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुका आधुनिक विकासयुक्त ठरत आहे. जे प्रकल्प पूर्ण होत आहेत, त्याची निगा राखणे प्रत्येक नागरिक, सरकारी कर्मचारी यांचे कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे : मुख्यमंत्री
राज्याचा विकास जलद गतीने सुरू असून, अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही पूर्ण करीत आहोत. काही दिवसात मांडवी नदीत रोरो फेरीही फेऱ्या मारताना दिसेल. ज्या प्रलंबित गोष्टी आहेत, त्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, तालुक्याचा चेहरामोहरा बदलल्याच्या दृष्टीने अतिशय वेगवान पद्धतीने विकास सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डिचोली तालुका शैक्षणिक हब म्हणून पुढे येत आहे. साखळी शहर देशातील क्रमांक एकचे शहर करण्याच्या दृष्टीने अनेक सुविधा प्रदान करण्यात येत आहेत. मये व डिचोली येथेही अनेक योजना राबविण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
भारतीय जवानांचे अभिनंदन
पाकिस्तान विरुद्धच्या कारवाईत भारतीय सैनिकांनी अप्रतिम कामगिरी करताना दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत संपूर्ण जगाला देशाची ताकद दाखवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या संपूर्ण टीमने सैनिकांना पूर्ण अधिकार दिल्याने सैनिकांनी केलेली कामगिरी व त्या माध्यमातून पाकिस्तानला शिकवलेला धडा कायम लक्षात राहील. यापुढे दहशतवादी कारवायांचा बिमोड होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. देश प्रथम ही आमची संकल्पना असून, त्यामुळे देशाच्या सीमा, देशाची जनता त्यांच्या रक्षणासाठी सरकार कर्तव्यदक्षतेने काम करत आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. भारत - पाकमध्ये शस्त्र संधी झालेली असली तरी भारत अतिशय सावधतेने सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे.