लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रायबंदर ते चोडण जलमार्गावर देशातील पहिल्या रो-रो फेरीबोट सेवेचा काल, सोमवारी शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्यातील अन्य आठ जलमार्गावरही जुन्या फेरीबोटींच्या जागी अशा प्रकारची रो-रो फेरीबोटी सुरू करण्याची योजना असल्याचे सांगितले.
यावेळी नदी व परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नदी व परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.
'द्वारका' व 'गंगोत्री' या नावाने रो-रो फेरीबोट रायबंदर ते चोडण जलमार्गावर धावणार आहेत. सध्या ही फेरीसेवा पीपीपी तत्त्वावर सुरू केली आहे. केवळ रस्ते व पूलच नव्हे तर सरकार जलमार्गावरील सुविधांचाही विकास करीत आहेत. रो-रो फेरीबोट सेवा हे त्याचेच उदाहरण आहे. प्रवाशांना प्रवास करताना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा त्यामागील हेतू आहे. रो-रो फेरीसेवा सुरू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या रो-रो फेरींचे इंजिन उच्च दर्जाचे असल्याने कमी वेळात अंतर गाठणे शक्य होणार आहे. यामुळे शून्य कार्बननिर्मिती होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधकांना सुनावले
जलमार्गावरील प्रवास सुविधा सुलभव्हावी, यादृष्टीने जेटींचा विकास केला आहे. यामुळे रो-रो फेरीबोटी सुरू करणे शक्य होईल. मात्र जेटींच्या विकासाच्या मुद्द्यावरून काहीजण आरोप करतात. विकासाच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी गैरसमज करून घेऊ नये. सध्या आठ जलमार्गावर रो-रो सुरू करण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.