वास्कोत डेंग्यू पुन्हा डोके वर काढतोय; मलेरियाबाधित रुग्णसुद्धा आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 10:51 PM2021-06-30T22:51:10+5:302021-06-30T22:55:07+5:30

Goa News : गोव्यातील इतर भागाबरोबरच वास्कोतही कोरोनाची महामारी ओसरत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत होता, मात्र डेंग्यूची पसरण होण्यास सुरू झाल्याने याबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे.

Dengue And Malaria infected patients were also found in Vasco Goa | वास्कोत डेंग्यू पुन्हा डोके वर काढतोय; मलेरियाबाधित रुग्णसुद्धा आढळले

वास्कोत डेंग्यू पुन्हा डोके वर काढतोय; मलेरियाबाधित रुग्णसुद्धा आढळले

googlenewsNext

पंकज शेट्ये

वास्को - दक्षिण गोव्यातील वास्को शहर व परिसराच्या भागात पुन्हा डेंग्यूने डोके वर काढण्यास सुरू केले असून जून महिन्याच्या सुरुवातीपासून २६ जूनपर्यंत चिखली उपजिल्हा रुग्णालयात केलेल्या ‘एनएस१’ चाचणीत ८२ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे आढळले आहे. सडा, नवेवाडे, वाडे, शांतीनगर अशा विविध परिसरातून डेंग्यूबाधित रुग्ण आढळण्यास सुरू झाले असून यात आणखीन वाढ होऊ नये यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्र सर्व प्रकारची पावले उचलत आहे.

गोव्यातील इतर भागाबरोबरच वास्कोतही कोरोनाची महामारी ओसरत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत होता, मात्र डेंग्यूची पसरण होण्यास सुरू झाल्याने याबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. चिखली उपजिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. अनिल उमरोस्कर यांना संपर्क केला असता जून महिन्यात वास्को व परिसरात डेंग्यूबाधित रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळल्याची माहीती त्यांनी दिली. या महिन्याच्या सुरुवातीपासून २६ जूनपर्यंत ३४४ जणांची डेंग्यूबाबत ‘एनएस१’ चाचणी चिखली उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. त्यापैंकी ८२ जणांना डेंग्यूबाधा झाल्याचे आढळून आले आहे असे डॉ. उमरोस्कर यांनी सांगितले. यावर्षाच्या सुरुवातीपासूनच ‘एनएस१’ चाचणीनुसार वास्को व जवळच्या परिसरात डेंग्यूबाधित रूग्ण आढळत असून जूनमध्ये सर्वांत जास्त डेंग्यूबाधित रुग्ण आढळले आहेत. 

जानेवारीमध्ये १७, फेब्रुवारीमध्ये १६, मार्चमध्ये २६, एप्रिलमध्ये २६, मेमध्ये १६ तर जून महिन्याच्या २६ तारीखपर्यंत ८२ जणांना डेंग्यूबाधा झाल्याचे ‘एनएस१’ चाचणीतून निष्पन्न झाल्याचे डॉ. उमरोस्कर यांनी कळविले. गेल्या सहा महीन्यात चिखली उपजिल्हा रुग्णालयात २२८० जणांची डेंग्यूबाबत ‘एनएस१’ चाचणी केलेली असून त्यातील १८३ जणांना डेंग्यूबाधा झाल्याचे आढळलेले आहे. एप्रिल महीन्यात सडा येथील एका ८ वर्षीय मुलीचा डेंग्यू सद्रुष्य तापाने मृत्यू झाला होता अशी माहिती त्यावेळी प्राप्त झाली होती.

वास्को व परिसरातील भागात डेंग्यूचा पसारा रोखण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्र सर्व प्रकारची पावले उचलत आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांना संपर्क केला असता ज्या ज्या भागात डेंग्यूबाधित रुग्ण आढळत आहेत त्याठिकाणी औषधांची फव्वारणी व इतर योग्य पावले उचलण्यात येत असल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी फुलझाडांच्या गमल्यात साचलेल्या पाण्यात, उघड्याने बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या पाण्यात व इत्यादी ठीकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूचा पसारा करणाºया डासांची पैदास होत असल्याचे आढळून आल्याची माहीती डॉ. रश्मी यांनी दिली. त्या त्याठीकाणी डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी औषध मारणे, फव्वारणी करणे अशा प्रकारची पावले उचलली जात आहेत. डेंग्यूचा पसारा करणाऱ्या डासांची पैदास रोखण्यासाठी नागरिकांनीही सावधगीरी बाळगणे गरजेचे असून भांड्यातील पाणी बंद करून ठेवणे, पाण्याला साचू न देणे अशा खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याचे डॉ. खांडेपारकर शेवटी म्हणाल्या.

मलेरियाचे १० रुग्ण आढळले

वास्को व परिसरातील भागात डेंग्यूबरोबरच मलेरिया बाधित रुग्ण आढळून येत असल्याचे जूनमध्ये दिसून आले. याबाबत माहितीसाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांच्याशी संपर्क केला असता जूनमध्ये येथे अजूनपर्यंत १० जणांना मलेरिया झाल्याचे आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली. वास्को व परिसरात मलेरिया आणखीन पसरू नये यासाठी उचित पावले शहरी आरोग्य केंद्र उचलत असल्याचे सांगितले.
 

Web Title: Dengue And Malaria infected patients were also found in Vasco Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.