लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्व. प्रा. दत्ता नाईक हे मी पाहिलेले निःस्वार्थी व्यक्तिमत्त्व. त्यांनी त्यांच्या कार्यातून अनेक युवकांना प्रेरित केले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी युवकांना राष्ट्रवादाकडे नेले. देश प्रथम या भावनेतूनच दत्ता नाईक यांनी आतापर्यंत समाजात काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या युवकांनी त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात शनिवारी शिक्षणतज्ज्ञ प्रा. दत्ता नाईक यांच्या हितचिंतकांनी विशेष श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संकल्प आमोणकर, नरेंद्र सावईकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. दत्ता नाईक यांच्याकडून नेहमीच समर्पण भावना शिकायला मिळाली. ते मला जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी केवळ आदिवासी समाजाच्या हिताचे विषय मांडले. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक यावे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
दत्ता नाईक व माझे गुरू-शिष्याचे नाते होते. ते एक कुशल संघटक व शिक्षणतज्ज्ञ होते. माझ्यातील व्यासपीठाची भीती त्यांनीच नाहीशी केली. ते नेहमीच सांगायचे आपल्याला कधीच कमी लेखू नये. याच मंत्राच्या आधारे मी आज यशस्वी झालो, असे खासदार तानावडे म्हणाले. दत्ता नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित बहुतांश मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.