लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवा आणि कोकणच्या संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेल्या दशावतार या पारंपरिक नाट्यप्रकारावर आधारित 'दशावतार' हा चित्रपट सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा आहे. दशावतार लोककलेला चांगले दिवस आले आहेत. कोकण, गोव्यातील लोकांना माहिती असलेली दशावतार लोककला या चित्रपटामुळे जगभरातील मराठी लोकापर्यंत पोहोचले, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
येथील आयनॉक्समध्ये काल बुधवारी दशावतार हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटाच्या प्रारंभ प्रसंगी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, दाजी साळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. सिनेमातील मुख्य कलाकार, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, कलाकार, दिग्दर्शक, निर्माता यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, दशावतार कोकणाप्रमाणेच गोव्यातील प्रत्येक गावागावात केला जात आहे. जत्रेनिमित्त दशावतार मंदिरामध्ये आयोजित केला जातो. आता हा दशावताराची माहिती जगभरात असणाऱ्या मराठीपर्यंत जाणार आहे. युवा पिढीलाही दशावतारचे महत्त्व कळेल. यावेळी अभिनेते सिद्धार्थ मेनन, रवी काळे, सुनील तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, गीतकार गुरु ठाकूर, दशावतार कलाकार दादा कोनसकर आदी उपस्थित होते.
'दशावतार' चित्रपटाच्या विशेष प्रीमियरला उपस्थित राहून तो पाहण्याची संधी मला मिळाली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभवळकर यांचा अप्रतिम अभिनय मनाला भावला. सिद्धार्थ मेनन, रवी काळे, सुनील तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, गीतकार गुरु ठाकूर आणि संपूर्ण कलाकार व तंत्रज्ञ मंडळींचे कार्य स्तुत्य आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर, निर्माते संजय दुबे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, सुजय हांडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. चित्रपटाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंददायी आहे. दशावतार चित्रपटाच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.